
हिंदी सक्तीवरून संपूर्ण महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकवटल्याने मिंध्यांच्या बुडाला चांगलीच आग लागली आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरेंनी मराठीसाठी काय केले असे पत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहून अकलेचे तारे तोडले आहेत. त्याचा शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी सणसणीत समाचार घेतला. कोण होतास तू, काय झालास तू… अरे वेड्या कसा वाया गेलास तू, अशा शब्दात विचारे यांनी सरनाईक यांना प्रत्युत्तर देत त्यांची साफ उतरवली आहे.
राजन विचारे यांनी प्रताप सरनाईक यांना झणझणीत अनावृत्त पत्र लिहिले असून त्यात सरनाईकांची कुंडलीच मांडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन बंधू मराठीसाठी एकत्र येत असताना सरनाईक तुम्ही एकनाथ शिंदे यांना पत्र का लिहिले? हे मराठी माणसाला कळलेलेच नाही. मुळात एक गद्दार दुसऱ्या गद्दाराला ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून प्रश्न विचारतो हेच हास्यास्पद आहे. तुमचा मराठीशी, शिवसेनाप्रमुखांशी आणि मराठी अस्मितेशी दुरान्वयेही संबंध नाही. धनुष्यबाण पक्षचिन्ह बाजूला करा आणि राजकीय मैदानात उतरा. मग गांडुळे चिरडल्यासारखे मराठी माणूस तुम्हाला कसा चिरडतो हे पहा. विकाऊ असलेले गेले, पण निष्ठावंत अजूनही आहेत हे लक्षात असू द्या, असेही विचारे यांनी सरनाईक यांना ठणकावले आहे.
पत्रातील फटकारे
सरनाईक तुम्ही काँग्रेसपासून सुरुवात केलीत. मग राष्ट्रवादीत शिरकाव केलात. तिथे रत्नजडीत घड्याळांची भेट देऊन वरिष्ठ नेत्यांची सलगी करण्याचे तुमचे ‘प्रताप’ सर्वश्रुत आहेत.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने तुमची झोप उडाली आहे. आणि तुमच्या बुडाला चांगलीच आग लागली आहे हे तमाम महाराष्ट्रातील जनतेला पक्के ठावूक झाले आहे.
भूमिपुत्रांना त्रास देऊन आदिवासींसाठी आलेला निधी वैयक्तिक विकासासाठी वापरून गैरव्यवहार केल्याचा आरोप तुमच्यावर भाजप नेत्यांनीच केला होता हे लक्षात ठेवा. आणि तुमच्या डोक्यावर अजूनही टांगती तलवार कायम आहे हे विसरू नका.