
झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज कुंदई माटिगीमु याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी अयोग्य आणि धोकादायक पद्धतीने गोलंदाजी केल्याबद्दल 15 टक्के मॅच फीचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच्या खात्यावर एक डिमेरिट गुणही नोंदवण्यात आला आहे.
ही घटना दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावातील 72 व्या षटकात घडली. माटिगीमुने गोलंदाजी केल्यानंतर बॉल परत त्याच्याकडे आला आणि त्याने तो फलंदाज लुआन डी प्रिटोरियसला फेकून मारला. फ्रिटोरियसच्या मनगटाला चेंडू लागल्याने आयसीसीच्या आचारसंहितेच्या नियम 2.9 च्या उल्लंघनासाठी माटिगीमुला दोषी ठरवण्यात आले. आयसीसीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार ही कारवाई आंतरराष्ट्रीय सामन्यात एखाद्या खेळाडूकडे अथवा त्याच्याजवळ अयोग्य आणि धोकादायक पद्धतीने चेंडू (किंवा इतर साहित्य) फेकल्यास लागू होणाऱया नियमांतर्गत करण्यात आली आहे.’
रेफरी रंजन मदुगले यांनी दिलेली शिक्षा माटिगीमुने स्वीकारली असून आपली चूक मान्य केल्याने औपचारिक सुनावणी टळली आहे.