टेनिसचा सामना म्हणजे वर्ल्ड कपच्या दबावासारखाच! टेनिसपटूंच्या मानसिक ताकदीवर कोहली फिदा

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली टेनिसपटूंच्या मानसिक ताकदीवर प्रचंड फिदा झाला. सर्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोविचचा विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेतील सामना बघण्यासाठी कोहलीने सोमवारी हजेरी लावली. त्यावेळी टेनिसचा सामना म्हणजे क्रिकेट वर्ल्ड कप किंवा हिंदुस्थान-पाकिस्तान दरम्यानच्या नॉकआऊट मॅचसारखा असतो, अशी प्रतिक्रिया कोहलीने दिली.

विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासह विम्बल्डनचे सामने बघण्यासाठी गेला होता. त्यावेळी हिंदुस्थानचे माजी टेनिसपटू विजय अमृतराज यांनी घेतलेल्या मुलाखतीत कोहलीने ही प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ‘क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये आम्ही जेव्हा पाकिस्तानविरुद्ध खेळत असतो किंवा सेमीफायनल व फायनलसारखी मॅच असते तेव्हा पाय आपोआप थरथरतात, मात्र टेनिसपटू उपांत्यपूर्व फेरीपासून प्रत्येक तुल्यबळ सामन्यात हा दबाव अनुभवत असतात. त्यामुळे टेनिसपटूंची मानसिक ताकद नक्कीच काबिले तारिफ होय.’

कोहली पुढे म्हणाला, ‘टेनिसमध्ये तरी पुनरागमन करण्याची संधी असते. क्रिकेटमध्ये एक चूक सामन्यातून बाहेर करत असते. कारण बाद झाल्यानंतर क्रिकेटपटूला दिवसभर प्रेक्षकांसारखे फक्त टाळय़ा वाजवत बसावे लागते, मात्र टेनिसपटू दोन सेट गमाविल्यानंतरही सामन्यात पुनरागमन करून विजयश्री खेचून आणू शकतो.

जोकोविचने 25 वे ग्रॅण्डस्लॅम जिंकावे!

‘नोवाक जोकोविच माझा मित्र आहे. आम्ही एकमेकांच्या संपका&त असतो. त्याने विम्बल्डन जिंकून कारकीर्दीतील 25 व्या ग्रॅण्डस्लम किताबावर नाव कोरावे असे वाटते. जोकोविच व स्पेनचा कार्लोस अल्काराज यांच्यात विम्बल्डनची फायनल व्हावी असे माझे स्वप्न आहे. या फायनलमध्ये जोकोविचने बाजी मारावी, असे मला वाटते,’ अशी इच्छाही कोहलीने आपल्या मुलाखतीत व्यक्त केली.