केडीएमसीची बेपर्वाई; रोज लाखो लिटर पाण्याची नासाडी, एमआयडीसीत पाणीबाणी

व्हॉल्व, जलवाहिन्यांना मोठ्या प्रमाणात गळती असल्याने डोंबिवलीत रोज लाखो लिटर पाणी गटार आणि नाल्यात मिसळत आहे. एमआयडीसी परिसरात पाण्याची नासाडी रोजच होत आहे. प्रशासनाच्या बेफिकीर कारभारामुळे देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने एमआयडीसी निवासी भागात पावसाळ्यातही नागरिकांच्या घशाला कोरड पडली आहे. त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाच्या कारभाराबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

रोजच्या पाणीगळतीमुळे स्थानिक रहिवाशांना अनेक वेळा पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. एमआयडीसी प्रशासनाकडून या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याने सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. काही समाजकंटक व्हॉल्ववर छेडछाड करत असल्याचे स्पष्टीकरण एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात येते. मात्र प्रशासनाकडून पाणीगळतीवर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

मानपाडा रोडवर व्हॉल्वला गळती
मानपाडा रोडवरील विको नाका व पीएनजी गॅलरीया शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळ गेल्या दोन दिवसांपासून व्हॉल्वला गळती आहे. याशिवाय कल्याण-शिळ रस्त्यावर एमआयडीसी फेज एक व दोन या भागांमध्येही मुख्य व्हॉल्वमधून पाण्याची गळती होत आहे. स्थानिकांनी यापूर्वीदेखील एमआयडीसी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर गळतीची तात्पुरती दुरुस्ती केली जाते. मात्र काही वेळातच पाण्याचा दाब वाढल्यास पुन्हा गळती सुरू होते.