
कल्याणमधील ज्या सहजानंद चौकात एक वर्षापूर्वी मोठे होर्डिंग कोसळून तीन जण गंभीर जखमी झाले होते त्याच चौकात महापालिकेने पुन्हा एकदा महाकाय होर्डिंग बसवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे कल्याणकरांनो, सावधान.. सहजानंद चौकात ‘यमदूत’ उभा राहतोय. विशेष म्हणजे ऐन पावसाळ्यात रस्त्यालगतच होर्डिंग उभारण्याचे काम सुरू झाले असून एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा संतप्त सवाल विचारण्यात येत आहे.
कल्याण शहरात अनेक रस्ते अरुंद असून रोज वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागतो. आग्रा रोडवरील सहजानंद चौकात तर मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम होते. या चौकात अनेक अपघात झाले आहेत. तरीदेखील रस्त्याला लागूनच भलेमोठे होर्डिंग उभारले जात आहे. अवघ्या एक वर्षापूर्वी 2 ऑगस्ट रोजी येथील होर्डिंग कोसळले होते. ही बाब माहीत असतानाही महापालिका प्रशासनाने पुन्हा त्याच ठिकाणी होर्डिंग परवानगी दिली आहे. याबाबत मालमत्ता विभागाचे उपायुक्त रमेश मिसाळ यांना विचारले असता सर्व नियम तपासूनच परवानगी दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला.
गेल्या वर्षी घाटकोपर येथे भलेमोठे होर्डिंग कोसळून 17 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर प्रशासनाने तत्काळ वर्दळीच्या ठिकाणचे होर्डिंग काढून टाकले. या घटनेपासून केडीएमसी प्रशासनाने धडा घेतला नसल्याचे दिसून आले आहे.
सध्या पावसाळा सुरू असून वादळी वारेदेखील वाहत आहेत. सहजानंद चौकातील वाहनांवर किंवा नागरिकांवर हे होर्डिंग कोसळण्याचा मोठा धोका आहे. पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी त्याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
रस्त्याच्या कडेला किंवा रहदारीच्या ठिकाणी भलेमोठे होर्डिंग्ज लावू नयेत असे हायकोर्टाचे निर्देश आहेत. तरीदेखील महापालिकेचे अधिकारी जिथे पूर्वी अपघात झाला त्याच ठिकाणी नव्याने होर्डिंग लावण्याची परवानगी कशी काय देऊ शकतात? हे काम तत्काळ थांबवावे, अन्यथा शिवसेना स्टाईल ने आंदोलन करू, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक सुधीर बासरे यांनी दिला आहे.