आता ‘टॅग इन हॅण्ड’चा खेळ संपला, ‘हातातील फास्टॅग’वाले थेट काळ्या यादीत, एनएचएआय करणार  कारवाई

आपल्याला माहीत आहे की, राष्ट्रीय महामार्गांवर टोल भरण्यासाठी फास्टॅगचा वापर केला जातो. फास्टॅग ही इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टीम आहे. त्यासाठी एक विशिष्ट टॅग कारच्या विंडस्क्रीनवर लावली जाते. मात्र काही जण टॅग विंडस्क्रीनवर न लावता हातात ठेवतात. त्याला टॅग इन हॅण्ड असेही म्हणतात. याविरोधात नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाने (एनएचएआय) मोठे पाऊल उचलले आहे. असे ‘लूज फास्टॅग’वाल्यांना त्वरीत  ब्लॅकलिस्ट केले जाणार आहे.

सरकारने अलिकडे अ‍ॅन्युएल पास सिस्टीम आणि मल्टी लेन फ्री फ्लो टोलिंग सारख्या नव्या उपक्रमांची  घोषणा केली. हे उपक्रम यशस्वी होण्यासाठी फास्टॅग यंत्रणेचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. काही वाहनचालक गाडय़ांवर फास्टॅग लावत नाहीत, त्यामुळे टोल प्लाझावर मोठी रांग लागते आणि या प्रकारात पेमेंटमध्ये गडबड होते. याचा परिणाम अन्य गाड्यांवर होतो.

एनएचएआयने टोल कलेक्शन एजन्सींना लूझ फास्टॅगची त्वरीत माहिती देण्यास सांगितले आहे. त्यासाठी विशेष इमेल आयडीदेखील देण्यात आला आहे. लूज फास्टॅगबद्दल माहिती मिळताच त्वरीत असे टॅग ब्लॅकलिस्ट किंवा हॉटलिस्ट केले जातील. त्यामुळे गडबड करणाऱ्यांवर  त्वरीत कारवाई करणे शक्य होईल.

देशात 98 टक्क्यांहून अधिक वाहने फास्टॅगने जोडलेली आहेत. त्यामुळे टोलवसुली डिजिटली जलद झाली आहे. मात्र ‘लूज
टॅग’सारखे कारनामे पूर्ण फास्टॅग यंत्रणेवर प्रतिपूल परिणाम करू शकतात. त्यामुळे एनएचएआयने हे पाऊल उचचले आहे.