
>> संजय कऱ्हाडे
सत्यनारायणाची पूजा घालायची, पण पोथी, फुलं, फळं, नारळ, इतर सगळं साहित्य पंडितजींनीच आणायचं. मंत्रसुद्धा त्यांनीच म्हणायचे! अरे, मग पूजा घालणाऱ्यांनी काय फक्त टाळ वाजवायचे! लॉर्ड्सला घातलेल्या पूजेसाठी पंडित बुमरा आले त्यांनीच पाच बळी घेतले अन् बाकीचे नुसते टाळच वाजवत राहिले! म्हणूनच इंग्लंडने 387 धावांचं पुण्य मिळवलं. त्यांच्या बॅटीतून उडालेली झेंडूची फुलंही कुणी झेलली नाहीत. जेमी स्मिथ कडक फलंदाजी करतो. त्याचा उडालेला सोपा झेल राहुलने सोडला. त्याने अर्धशतक ठोकलं, कार्सच्या साथीने 84 धावांची सुरेल आरती म्हटली. कार्सनेसुद्धा स्मिथच्या आवाजात आवाज मिळवत आयुष्यातलं पहिलं अर्धशतक आपल्या पोतडीत भरलं! 7 बाद 271 ते सर्वबाद 387.
पंडित बुमरांच्या पूजेला नजर लागली! प्रतिस्पर्धी संघाची धावसंख्या 400च्या आसपास गेली की पाच बळी घेणारा पुजारी पूजा सांगत असताना कुणीतरी सोसायटीमध्ये लाऊडस्पीकरवर ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम हैं…’ लावण्यासारखं वाटतं!
जोफ्रा आर्चर चार वर्षांनी कसोटी खेळण्यासाङ्गी परतलेला होता. संथ खेळपट्टीवर त्याने सुरुवातच केली दीडशे कि. मी. वेगाने. त्याच्या अशी यशस्वी जयस्वालने वोक्सला तीन चौकार मारलेले होते. पण मग आर्चरने त्याला खडबडून उङ्गवलं अन् स्लिपमध्ये ब्रूककडे झेल देण्यास भाग पाडलं आणि करुण नायरचा बचाव भेदला तो बेन स्टोक्सने. ज्यो रूटने पहिल्या स्लिपमध्ये घेतलेला तो झेल अप्रतिम होता. करुणने 40 धावा केल्या, पण खेळपट्टीवर उभं राहून मोठी खेळी करणं त्याला अजून जमलेलं नाहीये. दुसऱया डावात त्याला आणखी एक संधी मिळेल. पण जर आश्वासक खेळी करणं त्याला जमलं नाही तर गौतम गंभीर आणि अजित आगरकरच्या कुऱ्हाडीपासून कुणी त्याला वाचवू शकणार नाही.
कप्तान गिलसुद्धा लवकर बाद झालाय…
खैर, आपल्या हातून पाप घडल्याची जाणीव राहुलच्या मनात ङ्खसली असावी असं राहुलची बचावात्मक फलंदाजी पाहून वाटलं. त्याने किल्ला लढवायचा, पंडित बुमरांनी सांगितलेल्या पूजेचा मान राखायचा असं ठरवलं आणि सुकाणू सांभाळलंय असं वाटतंय!
सिराज आणि कंपनी, तुम्हीसुद्धा दुसऱया डावात आणि यापुढेही आपापल्या हातात आपापल्या पोथ्या घ्या हो!





























































