पत्नीला शोधत पतीने कार थेट प्लॅटफॉर्मवर आणली, नवरा-बायकोच्या भांडणाचा रेल्वे प्रवाशांना फटका

नवऱ्यावर नाराज होऊन बायको माहेरी निघाली होती. परंतु बायकोला शोधत नवरा थेट रेल्वे स्टेशनवर पोहोचला. तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याने आपली कार थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवर आणली. रेल्वे प्लॅटफॉर्मवर कार दिसल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. रेल्वे पोलिसांनी गाडीचालक तरुणाला गाडी थांबवण्यास सांगून त्याला खाली उतरवले. हा तरुण मद्यधुंद अवस्थेत होता. पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची कार जप्त केली आहे. ही घटना ग्वालियर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म एकवर घडली. आरोपी तरुणाचे नाव नितीन राठोड असे आहे. तो कपडय़ाचा व्यापारी आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. तो दररोज दारू पित असल्याने या नवरा-बायकोमध्ये रोज भांडण होत आहेत. त्या दिवशीही आरोपीचे बायकोसोबत भांडण झाले होते. भांडणानंतर बायको माहेरी निघाली होती. बायको रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतर नितीन कार घेऊन थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवर आला. कार रेल्वे प्लॅटफॉर्मवर दिसल्याने प्रवाशांची पळापळ झाली. पोलिसांनी तत्काळ धाव घेत नितीनला कारमधून उतरवून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याची कारही जप्त केली आहे.