
एक्स्पायरी डेट संपल्यानंतर संबंधित मालाची विल्हेवाट न लावता बाजारात विक्री केली जात असल्याचा प्रकार ठाणे जिल्ह्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सुमारे 200 टन माल हस्तगत केला आहे. या मालाची किंमत सुमारे 30 लाख रुपये आहे.
गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपींमध्ये साकीनाका येथील इरफान चौधरी आणि भिवंडी येथील अक्रम शेख यांचा समावेश आहे. फ्लिपकार्ट कंपनीने एक्स्पायरी डेट संपलेले कडधान्य, आटा, ड्रायफ्रुट्स, साखर, चॉकलेट, कॉस्मेटिक, सॅनेटरी प्रॉडक्ट्स असा माल शीळ-डायघर येथील इको स्टार रिसायकलिंग या कंपनीत विल्हेवाट लावण्यासाठी पाठवला होता. मात्र दोन्ही आरोपी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या मालाची विल्हेवाट न लावता तो पुन्हा विक्रीसाठी बाजारात आणला. भिवंडी शहरात या मालाची विक्री सुरू केली.
बनावट डिलिव्हरी चलनाचा वापर
एक्स्पायरी डेट संपलेला हा माल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आरोपींनी कंपनीच्या बनावट डिलिव्हरी चलनाचा वापर केला. या मालाची भिवंडी परिसरात मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गुन्हे शाखेने शीळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना येत्या सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत.
200 टन माल जप्त
एक्स्पायरी डेट संपलेल्या मालाची विक्री होत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी इको स्टार रिसायकलिंग अॅण्ड इ वेस्ट रिसायकलिंग कंपनीच्या गोडाऊनवर छापा मारला. या गोडाऊनमध्ये विल्हेवाट लावण्यासाठी आणलेले सर्व प्रकारचे अन्नधान्य, कडधान्य, विविध कंपन्यांचा आटा (पीठ), साखर, तांदूळ, सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स, टॉयलेट क्लिनर, सॅनेटरी पॅड, वॉशिंग पावडर, साबण असा अंदाजे 200 टन माल आढळून आला.