सांगोल्यात ‘शक्तिपीठ’ला विरोध; शेतकऱ्यांनी मोजणी रोखली

शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला सरकारकडून वेग येत असून, सांगोला तालुक्यातील चिंचोली आणि मांजरी या गावांमध्ये मोजणीस सुरुवात करण्यात आली. मात्र, येथील शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध करीत ही मोजणी रोखली आहे.

ज्या शेतकऱ्यांची मोजणीस सहमती आहे, अशा शेतकऱ्यांचेच क्षेत्र मोजण्यात येत आहे, असे ‘शक्तिपीठ’च्या मोजणीसंदर्भात प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, मोजणीदरम्यान पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येत आहे. शुक्रवारी (दि. 11) सुरुवातीस मांजरीतील काही शेतकऱ्यांनी या मोजणीला जोरदार विरोध केल्याने त्यांच्या जमिनींची मोजणी थांबवण्यात आली. चिंचोली गावातही विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांची मोजणी थांबवण्यात आली.

शक्तिपीठ महामार्गाविरोधात सांगोला तालुक्यात शेतकरी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांनी या महामार्गाला तीव्र विरोध दर्शवत, ‘हा महामार्ग शेतकऱ्यांवर लादला जात असून, त्याची आवश्यकता नाही’, अशी भूमिका मांडली होती. या पार्श्वभूमीवर संयुक्त मोजणीस पोलीस संरक्षणात सुरुवात झाल्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा आंदोलनाची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, मांजरी आणि चिंचोली गावात शक्तिपीठसाठी संयुक्त मोजणी सुरुवात केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. त्यांचीच मोजणी केली जात आहे. भूसंपादनाबाबत अडचण असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन प्रांताधिकारी माळी यांनी केले आहे.

शक्तिपीठ महामार्गाची गरजच नसून तो रद्द केला पाहिजे, अशीच आमची भूमिका आहे. महामार्ग शासनास करायचाच असल्यास अगोदर भूसंपादनाचा दर जाहीर करावा. शेतकरी त्या संदर्भात विचार करून निर्णय घेतील. मात्र,  शेतकरी संघर्ष समितीचा या महामार्गाच्या मोजणीस विरोध कायम आहे.

– सचिन देशमुख, अध्यक्ष, शेतकरी संघर्ष समिती, सांगोला तालुका