
पैशांचा पाऊस पाडण्यासाठी कर्जत तालुक्यातील हालवली आदिवासी वाडीमधील स्मशानभूमीत काळी जादू करीत असलेल्या दोन तरुणांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडले. अन्य चौघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. ओम फट् स्वाहा करीत असलेल्या तरुणांना बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
मुसळधार पाऊस सुरू असताना हालवली ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाडीतील स्मशानभूमीत काही तरुण संशयास्पद हालचाली करताना स्थानिक ग्रामस्थांना दिसले. स्मशानभूमीत काळी जादू केली जात असल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर ग्रामस्थानी स्मशानभूमीकडे धाव घेतली.
ग्रामस्थ आपल्याकडे येताना पाहून यातील चार तरुण पळून गेले. दोघांवर मात्र ग्रामस्थांनी झडप घातली. स्मशानभूमीतील प्रकार पाहून या दोघांना ग्रामस्थांनी चांगला चोप दिला. नंतर या प्रकाराची माहिती कर्जत पोलिसांना देण्यात आली. पकडलेल्या तरुणांमध्ये एक तरुण स्थानिक असल्याचे समोर आले असून दुसरा तरुण हा सुधागड पाली येथील राहणारा असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
लिंबू, सुया, बाहुल्या
स्थानिक ग्रामस्थांनी अचानक स्मशानभूमीत धाड टाकल्याने काळी जादू करीत असलेल्या तरुणांची एकच पळापळ उडाली. पैशांचा पाऊस पाडण्यासाठी या तरुणांनी काळी जादू करण्यासाठी गुलाल, अबीर, आणि सफेद कपड्यात गुंडाळलेल्या दोन काळ्या बाहुल्या, लिंबू, सुगंधी द्रव, सुया आदी साहित्य जमा केले होते.