एकाच कंत्राटदाराला कामे देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा, महेश सावंत यांची मागणी

सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱयांचा भ्रष्ट कारभार शिवसेना आमदार महेश सावंत यांनी आज विधानसभेत निदर्शनास आणला. सन 2013-14 पासून आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वसई-विरार महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्त्यांची दुरुस्ती आणि देखभालीची कामे 2013पासून मे. चंदना कन्स्ट्रक्शन या एकाच पंपनीला देत आहेत. तसेच या पंपनीने कामे केली नसतानाही अनेक कामांची बिले सर्रास वटवत आहेत, असे महेश सावंत यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे सभागृहात सांगितले.

मे. चंदना कन्स्ट्रक्शन यांना सातत्याने मागील 10-12 वर्षांपासून दरवर्षी 40 ते 50 कोटी रुपयांच्या अवैध मार्गाने निविदा मंजूर करून कार्यादेश देण्यात आल्याचे समोर आले आहे. 2013-14मध्ये विरार (पूर्व) कोपरी येथे सामाजिक सभागृह बांधण्याचे एकच काम दोन वेगवेगळय़ा पंत्राटदारांना दिल्याचे दाखवण्यात आले आणि त्यांची देयकेही बांधकाम खात्याकडून मंजूर केली गेली, असे आमदार सावंत यांनी सांगितले.

या भ्रष्टाचारात महापालिका अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी,  कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता, कनिष्ठ अभियंता या सर्वांचे संगनमत आहे. त्यांनी मंजूर केलेल्या कामांची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि अभियंत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांच्या मालमत्तेचीदेखील स्वतंत्र चौकशी करावी. संबंधित ठेकेदारालाही काळ्या यादीत टापून शासनाकडून दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी आमदार सावंत यांनी केली.