एआयमुळे वेळेआधीच होणार रोगांचे निदान, मुंबई विद्यापीठाचा आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी पुढाकार

मुंबई विद्यापीठाने आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी पुढाकार घेत अत्याधुनिक ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर ऑफ एक्सलन्स’ केंद्र स्थापन केले आहे. या केंद्राचे बुधवारी उद्घाटन झाले. मुंबई विद्यापीठाच्या माहिती तंत्रज्ञान विभागात हे अद्ययावत सोयीसुविधायुक्त केंद्र स्थापन केले असून याद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे महिलांना होणाऱ्या रोगांचे वेळीच निदान करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य होईल.

‘स्वस्थ नारी सशक्त भारत’ या प्रकल्पाअंतर्गत महिलांच्या आरोग्यामध्ये क्रांती घडवण्याच्या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राद्वारे सुरुवातीला दोन मुख्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. ज्यामध्ये पीसीओएस आणि स्तन कर्करोगचा समावेश आहे. पीसीओएसच्या स्थितीचा अंदाज घेण्यासाठी प्रमुख एआय मॉडेल्सना या स्थितीच्या महत्त्वाच्या पॅरामीटर्सवर प्रशिक्षित करण्यात आले. यामध्ये सध्याच्या तुलनात्मक अभ्यासात 90 टक्के अचूकता दिसून आली. तर स्तनाच्या कर्करोगाची चाचणी घेण्यासाठी डीप लर्निंग मॉडेल्सचा वापर करण्यात आला, ज्यामध्ये लहान 97 टक्के अचूकता दिसली.

केंद्राच्या उद्घाटनावेळी टाटा मेमोरिअल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, सीओईपी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुनील भिरूड, वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. पल्लवी सपले, माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ. श्रीवरमंगई, प्रा. श्रीनिवास नारायणन उपस्थित होते.

भविष्यात शेती, शिक्षण, पायाभूत क्षेत्रासाठी उपयोग

या केंद्राच्या माध्यमातून एआय तंत्रज्ञानाचा वापर करून डॉक्टरांना रोगांचे निदान करताना उपयुक्त अशी प्रणाली विकसित करण्यासाठी काम केले जाणार आहे. नजीकच्या काळात शिक्षण, पायाभूत सुविधा आणि शेती या क्षेत्रातही संभाव्य धोके टाळण्यासाठी आणि भविष्यकालीन उपाययोजना करण्यासाठी या केंद्राच्या माध्यमातून काम केले जाणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.