
खासदार संदिपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावर अडीच एकर नाही, तर कोटय़वधीची साडेआठ एकर जमीन हिबानामा करून घेतली आहे. फक्त चार सेपंदात हा सर्व व्यवहार झाला असल्याचा गंभीर आरोप एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला. भुमरे यांचा ड्रायव्हर जावेद शेख यांना आयकर विभागाने दीडशे कोटीची जमीन भेट मिळाल्याबद्दल नोटीस पाठवली आहे. या प्रकरणात मोठा घोटाळा असल्याचा आरोपही जलील यांनी केला.
सालारजंग वंशजाकडून जावेद रसूल शेख यांना दिलेल्या जमिनीचे प्रकरण सध्या गाजत आहे. या जमीनप्रकरणी माजी खासदार इम्तियाज जलील पत्रकार परिषदेत म्हणाले की, बोगस नवाबाच्या मदतीने भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावे जमीन हिबानामा करून देण्यात आला. हा व्यवहार केवळ 500 रुपयांच्या बॉण्डवर झाला. इतकेच नव्हे, तर पीआर कॉर्ड मिळविण्यासाठी अधिकाऱयांनाही हाताशी धरण्यात आले. रजिस्ट्री न करता थेट मालकी हस्तांतरीत करण्यात आली, असा आरोप जलील यांनी केला.

























































