मुंबई, ठाणेकरांना आणखी पाच दिवस उकाड्याचा ताप; कडक ऊन, आर्द्रतेमुळे घामाने आंघोळ; उपनगरात नुसताच शिडकावा

गेल्या काही दिवसांपासून नाशिक, पुणे, कोकणसह विदर्भात मुसळधार पाऊस पडतो आहे. नागपुरात पावसाने धुमाकूळ घातला; परंतु मुंबई, ठाणे कोरडेच आहे. कडक ऊन, मधेच ढगाळ, अधूनमधून शिडकावा असे वातावरण आहे. अक्षरशः घामाने आंघोळ होत आहे. मुंबई, ठाणेकरांना आणखी पाच दिवस उकाड्याचा हा ताप सहन करावा लागणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

उत्तर प्रदेश, बिहार येथे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने एक सिस्टम तयार झाली असून त्याचा परिणाम म्हणून विदर्भात मुसळधार पाऊस पडतो आहे. मात्र, अरबी समुद्रात अशाप्रकारचे कमी दाबाचे क्षेत्र किंवा सिस्टम तयार झाली नसल्याने मुंबई, ठाण्यात पाऊस पडत नसल्याची माहिती हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेचे वैज्ञानिक डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.

22 तारखेपर्यंत हलका पाऊस

22 जुलैपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये हलका पाऊस पडेल. अधूनमधून एखादी मोठी सर येईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सायंकाळच्या सुमारास मुंबई आणि ठाण्यात विजेच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हाच अंदाज दोन दिवसांपूर्वीही हवामान विभागाने वर्तवला होता. परंतु, केवळ एखादी सर येऊन जात असून हवामान कोरडेच असल्याचे चित्र आहे. कोल्हापूर घाटमाथ्यासाठी मात्र अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. येथे ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा इशाराही देण्यात आला आहे.