
12 तासांची ड्युटी करायची… घरी जायचे तर दीड ते दोन तास लागणार… त्यापेक्षा पोलीस ठाण्यात मच्छरांच्या गराड्यात विश्रांती घेऊन पुन्हा कामाला लागायचे… घरे मुंबईत आहेत त्यांना जीव मुठीत घेऊन राहावे लागतेय… चार दिवसांपूर्वी अंधेरी म्हाडा पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळला… ही व्यथा आहे मुंबई पोलिसांची. आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर 2024मध्ये घरांचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले. आता पुन्हा तेच सुरू आहे. पोलिसांना घरे मिळणार कधी, असा सवाल करत पोलीस पत्नी एकता मंचने तोडगा निघाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
मुंबईतच शासकीय सवलतीच्या दरात कायमस्वरूपी मालकी हक्काने घरे द्यावीत, निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या दंडनीय अनुज्ञाप्ती शुल्कातील वाढ रद्द करावी या प्रमुख मागण्या आहेत.
दोन दिवसांत निर्णय घ्या!
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही अधिकाऱयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण अधिकाऱयांच्या उपस्थितीत बैठक घेऊन पोलिसांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र दोन दिवसांत निर्णय झाला नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पोलीस पत्नी एकता मंचच्या अध्यक्षा जान्हवी भगत यांनी दिला आहे.
पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळला
आझाद मैदानात आंदोलन सुरू असताना अंधेरीत म्हाडाच्या पोलीस वसाहतीत एका घराचा स्लॅब कोसळला. सुदैवाने या वेळी जीवितहानी झाली नाही किंवा कुणी गंभीर जखमी झाले नाही.


























































