
सोयगाव जिल्हा परिषद शाळेतील सातवी वर्गातील 13 वर्षीय विद्यार्थिनी शाळा सुटल्यावर कंक्राळा राहत्या गावी परतली. वाहनात दबा धरून बसलेल्या चालक व शासकीय दवाखान्यातील परिचारिकेच्या वेशात असलेल्या दोन महिलांनी विद्यार्थिनीस तिची विचारपूस करीत लसीचे इंजेक्शन देत अपहरण करण्याचा प्रयत्न मंगळवारी केला; मात्र गावकरी सतर्क झाल्यामुळे ओम्नी गाडीतील अपहरणकर्त्या भामट्यांनी धूम ठोकली. या प्रकरणी शनिवार, 19 रोजी विद्यार्थिनीच्या वडिलांनी सोयगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
मंगळवार, 15 रोजी सोयगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेत सातवी वर्गात शिक्षणानिमित्त अप-डाउन करणारी १३ वर्षीय विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे राज्य परिवहन महामंडळाच्या सोयगाव बस आगाराच्या बसमधून कंक्राळा (ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) बसस्थानकावर उतरली. वाहनात चालक व परिचारिकेच्या वेशातील दोन महिला दबा धरून होत्या. चंचल हिस प्राथमिक विचारपूस करीत दोन्ही हात घट्ट धरत जबरदस्तीने हाताच्या दंडाला इंजेक्शन देत अपहरण करण्याचा प्रयत्न करत असतानाच आजूबाजूला असलेल्या उपस्थितांना याची भनक लागली असावी असा समज झाल्याने त्या भामट्यांनी धूम ठोकली.
कंक्राळा गावातील ग्रामपंचायत सरपंच पदाचा वाद शिंगेला पोहचला असून, इमारतीला लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. ते सुरळीत असते तर अपहरण करण्याच्या उद्देशाने आलेल्या गाडी नंबरसह त्या भामट्यांचा पर्दाफाश करण्यासाठी मोठी मदत झाली असती.
तक्रारदार
बुधवारी चंचल शाळेत न आल्याने वर्ग शिक्षिकेने पालकांना मोबाईलवरून विचारणा केली. पालकांनी तिला शाळेत लस दिल्याने मुलगी तापाने फणफणत असल्याचे सांगितले. शाळेत लस दिली नसल्याचे सांगितल्यावर लस कुणी दिली ? का दिली म्हणून वडील गव्हाणे जाब विचारण्यासाठी गेले असता ही घटना उघडकीस आला. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण तालुक्यात पसरल्याने एकच खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांसह पालकवर्गात सुरक्षाव्यवस्था कारणाने चिंता पसरली असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, डॉ. गिरीश चावडा तालुका आरोग्य अधिकारी यांना विद्यार्थिनीचे आई, वडील यांनी घडलेला प्रकार सांगितला. मात्र, केंद्र शासन, राज्य शासनाकडून लसीकरणाचा कुठलाही कार्यक्रम हाती घेण्यात आलेला नाही, असे सांगितले आहे. या घटनेमुळे शिक्षक विद्याधर बागूल, पंकज रगडे, दौलतसिंग परदेशी, शिक्षिका यांना सूचना दिल्या आहेत की घटनेबाबत शालेय विद्यार्थ्यांना अवगत करून सतर्क राहावे, असे आवाहन शनिवारी करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी व पालकांनी त्याच बरोबर तालुक्यातील जनतेने सतर्क व्हावे. आपल्या गावात लसीकरणासाठी असे कोणीही आल्यास संबंधितांकडे प्रथम ओळखपत्र असल्याची खात्री करावी नसेल तर लस घेऊ नका. तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क करा, किंवा कायदेशीर पोलिसांना कळवा. असे आवाहन केले आहे.
डॉ. गितेश चावडा तालुका आरोग्य अधिकारी सोयगाव