
ठेका मिळाल्यानंतर रजिस्ट्रेशन केलेल्या अमित साळुंखे याच्या कंपनीला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापनाचे 1 हजार कोटीचे कंत्राट बहाल करण्यात आले आहे. संशयित पार्श्वभूमी असलेल्या ठेकेदाराला दिलेला ठेका पालिका आयुक्तांनी तातडीने रद्द करावा अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा शिवसेना पक्षाने दिला आहे. ‘चेन्नई पॅटर्न’ च्या नावाखाली सुमित एन्कलोप्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड या साळुंखेच्या कंपनीला ठेका देणारा सत्ताधारी पक्षातील ‘आका’ कोण, असा प्रश्नही कल्याण- डोंबिवलीकर विचारत आहेत.
शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अमित साळुंखे याचा आणि कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या कारनाम्याचा पर्दाफाश केला. केडीएमसीने अमित साळुंखेच्या कंपनीला घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका 9 ऑगस्ट 2024 रोजी दिला. धक्कदायक बाब म्हणजे सुमित कंपनीची स्थापना 28 ऑगस्ट 2024 ला झाल्याची नोंद आहे. म्हणजेच कंपनी अस्तित्वात नव्हती तरीही तिला ठेका कसा मिळाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी महिला जिल्हा संघटक वैशाली दरेकर – राणे , पश्चिम शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे उपस्थित होते.
‘ठाण्या’तून हस्तक्षेप
हा ठेका देताना अनेक अनुभवी ठेकेदार कंपन्यांना डावलले होते. ‘ठाण्या’तून राजकीय हस्तक्षेप होऊन अनुभव नसलेल्या सुमित एन्कलोप्लास्ट कंपनीच्या घशात वार्षिक 85 कोटी घालण्यात आले. या कंपनीचा स्लीपर पार्टनर कोण, याबाबत पालिका मुख्यालयात आज दिवसभर दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.