
देवेंद्र फडणवीस नेहमी नैतिकतेबद्दल, स्वच्छ कारभाराबद्दल बोलत असतात. चांद्यापासून बांद्यापर्यंत अशा नैतिकतेच्या गप्पा मारता आणि आपल्या मंत्रीमंडळात डान्सबार चालवणारे मंत्री घेता; असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रीपदावर घेण्याचे सुरू असलेले प्रयत्न, सुमित फॅसिलिटीज या 850 कोटींचा घोटाळा करणाऱ्या कंपनीचे श्रीकांत शिंदे यांच्या मेडिकल फाऊंडेशनशी असलेलं कनेक्शन यावर बोलताना संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
”अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रीमंडळात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढी घाई काय झाली आहे त्यांना? या सरकारमध्ये फौजदार सुद्धा त्यांचेच, न्यायालयं सुद्धा त्यांचीच, चौकशी समित्याही त्यांच्याच. त्यामुळे कुणाला क्लिनचीट मिळणार हे आधीच ठरलेलं असतं. धनंजय मुंडे यांना क्लिन चीट कोण देतंय ते माहित नाही. ज्या प्रकरणात त्यांना जावं लागलं ते प्रकरण अत्यंत गंभीर आहे. अद्याप संतोष देशमुख प्रकरणाचा निकाल लागायचा आहे. सध्या याला काढायचं त्याला घ्यायचं हेच सुरू आहे. खरंतर यांचं संपूर्ण मंत्रीमंडळ बरखास्त करून ते रिशफल करणं गरजेचं आहे. जे मंत्री भ्रष्ट आहेत, जे मंत्री डान्स बार चालवतात ते तुमच्या मंत्रीमडंळात आहेत आणि आपण नैतिकतेच्या गप्पा मारत चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरताय, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
श्रीकांत शिंदे यांच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून काळा पैसा सफेद करण्याचं काम सुरू
सुमित फॅसिलिटीजविषयी बोलतानाही संजय राऊत यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. ”देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सरकारने कानाचे पडदे साफ केले पाहिजे, विरोधी पक्ष बोलतोय ते गांभिर्याने घ्या. नाहीतर एकदिवस झारखंडचे पोलीस येऊन तुमच्या मंत्र्यांला, खासदाराला घेऊन जातील. सुमित फॅसिलीटीज कंपनी डेप्युटी सीएमचे बाळराजे श्रीकांत शिंदे चालवत असलेल्या फाऊंडेशनशी संबंधित आहे. या मेडिकल फाऊंडेशनमधला पैसा भ्रष्ट मार्गाने आलेला आहे. हा अमित साळुंखेच्या सुमित फॅसिलिटजला मोठ मोठी कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम शिंदे पिता पुत्रांनी केलेलं आहे. मद्य घोटळा समोर आला, अॅम्ब्युलन्स घोटाळा, सुमित फॅसि्लिटजला शिंदे पिता पुत्रांनी गैरप्रकार करत कशी मदत केली ते आता समोर आलं आहे. कल्याणचं घन कचरा व्यवस्थापनाचं कॉन्ट्रॅक्ट नियमबाह्य पद्धतीने घाई घाईन याच सुमित फॅसिलिटीजला दिलं. याचे सगळे घोटाळे 800 कोटींच्या वर आहे. नाव जरी अमित साळुंखेचं असलं तरी धडा धड कसं टेंडर दिलं गेलं. याच्या मागे नक्की कोणाची आहे. हे सगळे सुत्रधार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात आहे. या घोटाळ्यातला पैसा श्रीकांत शिंदे यांच्या फाऊंडेशनमध्ये येतो. यातून ब्लॅक मनी व्हाईट करण्याचं काम सुरू आहे., असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
”फडणवीस इतरांना नैतिकचे धडे शिकवत असतात. स्वच्छ कारभार, नैतिकता, सहन करणार नाही, पाहून घेईन असं बोलत असतात . मग आता या पिता पुत्रांना पाहून घ्या. हजारो कोटींचे घोटाळे या शिंदे पुत्रांनी सुमित फॅसिलिटीजमधून केले आहेत. म्हणून त्यांची धावाधाव सुरू आहे. कल्याण डोंबिवलीमधल्या घन कचऱ्याचा 850 कोटींचे कॉन्ट्रॅकचे लाभ कुणाच्या खात्यात गेले ते तपासण्यासाठी फडणवीसांनी एसआयटी स्थापन केली पाहिजे. हे प्रकरण आता ईडीच्या हातात जाण्याची शक्यता आहे याची सूत्र महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळापर्यंत व टेंभीनाक्यापर्यंत जायची शक्यता आहे, असे संजय राऊत म्हणाले.