
काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बंगळूरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबुल केले, पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार काय झोपा काढत होते काय? असा संतप्त प्रश्न विचारून अजित पवारांनी याची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
भाजपा युती सरकार व पुण्याचे पालक मंत्री अजित पवार यांचा खरपूस समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, पुणे हे महाराष्ट्रातील औद्योगिक, सांस्कृतीक व राजकीय घडामोडींचे महत्वाचे केंद्र आहे. पुण्याचा नावलौकिक सर्वच बाबतीत मोठा होता पण तो आता इतिहासजमा झाला असून पुण्यात आता कोयता गँग, ड्रग्जचा काळाबाजार जोरात सुरु आहे. एक पाऊस पडला तरी पुणे जलमय होते वरून ट्रॅफिकची समस्या वाढलेली आहे, परिणामी आयटी उद्योगाला घरघर लागली आहे. पुण्यासह राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, सत्ताधारी पक्षाचा वाढलेला भ्रष्टाचार,पदाधिकाऱ्यांची गुंडगिरी यांना उद्योजक वैतागले असून पायाभूत सुविधांचा बट्ट्याबोळ झाला आहे म्हणून आय टी उद्योग दुसऱ्या राज्यात जात आहेत. राज्यातील आहे ते उद्योग तर जातच आहेत पण राज्यात येऊ घातलेली मोठी गुतंवणूकही कशी गुजरातली गेली हे काँग्रेस पक्षाने सातत्याने उघड केले आहे. वेदांता फॉक्सकॉन हा तब्बल 1.6 लाख कोटी रुपयांची गुतंवणूक व 2 लाख रोजगार देणारा उद्योग भाजपा युती सरकारच्या नाकर्तेपणामुळेच गुजरातला गेला पण भाजपा सरकार मात्र ते मान्य करायला तयार नाही. आता जर उपमुख्यमंत्रीच उद्योग बाहेर जात आहेत हे सांगत असतील तर सरकारने यावर खुलासा करावा, असे सपकाळ म्हणाले.
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, फक्त पुणे शहराचीच वाताहत होत नसून नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि मुंबईतही फारशी समाधानकारक परिस्थिती नाही. राज्यात बेरोजगारांच्या फौजा उभ्या आहेत, त्यांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहे, महागाईने जगणे कठीण झाले आहे आणि सरकारचे मंत्री मात्र हिंदू मुस्लीम भांडणे लावून खोके भरत आहेत. ही आका व खोके संस्कृतीच महाराष्ट्राचा घात करत असून एवढे भ्रष्ट, निष्क्रीय व निर्ल्लज सरकार राज्यात आजपर्यंत झालेले नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.