पंतप्रधान मोदी ‘त्या’ 26 जणांवर एक शब्दही बोलले नाही त्यामुळे अत्यंत दु:खी, शुभम द्विवेदीच्या पत्नीने व्यक्त केली खंत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर तब्बल पावने दोन तास भाषण केलं. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव यावर त्यांनी माहिती दिली. मात्र एवढ्या लांब लचक भाषणात पंतप्रधानांनी एकदाही या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या त्या 26 नागरिकांचा उल्लेख केला नाही. त्यावर या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले शुभम द्विवेदी यांच्या पत्नी एशान्या द्विवेदी यांनी खंत व्यक्त केली आहे. ANI शी बोलताना एशान्या यांनी ही खंत व्यक्त केली. तसेच राहुल गांधी व प्रियांका गांधी यांनी त्यांच्या भाषणात या नागरिकांचा व शुभमचा उल्लेख केले म्हणून एशान्या यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

”पंतप्रधानांनी लोकसभेत सर्व गोष्ट सविस्तर सांगितलं. त्यांनी त्या 26 लोकांसाठी काहीही बोलले नाही. मला खरंच असं वाटलेलं की त्या 26 जणांसाठी पंतप्रधान काहीतरी बोलतील पण त्यांनी त्यांच्याबद्दल एक शब्दही बोलले नाहीत. मला याचं फार वाईट वाटलं. प्रियांका गांधी राहुल गांधी यांनी त्या 26 जणांची नावं घेतली. त्यासाठी मी त्यांचे आभार मानते”, असे एशान्य म्हणाल्या.