
राहुरी बाजार पेठेतील वर्धमान ज्वेलर्स चोरीच्या गुह्यातील दोन आरोपींना राहुरी पोलिसांनी पुणे जिह्यातील लोणीकंद येथून अटक केली. दोघांच्या ताब्यातून 5 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपींना राहुरी न्यायालयाने 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
राहुरी पोलीस, यवत पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा पुणे येथील पोलीस पथकाने दोन्हीही गुह्यांचा समांतर तपास केला असता सदरचे गुन्हय़ातील आरोपी विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी, अतुल सुरेश खंडागळे (दोघे रा. पुणे) व त्यांच्या इतर चार साथीदारांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. राहुरीतील वर्धमान ज्वेलर्स हे दुकान फोडून 60 लाख 45 हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरी गेल्याची फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत 14 जुलैला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुह्यांमध्ये आरोपीबाबत कुठलाही पुरावा नसताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या पोलीस पथकाने दोन आरोपींना अटक केली.
पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, सूरज गायकवाड, राहुल यादव, विकास साळवे, प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, सतीश कुऱहाडे, नदीम शेख, सचिन ताजने, सचिन धनात, दरेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपी विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध वेगवेगळ्या जिह्यातील पोलीस स्टेशनमध्ये तब्बल 90 गुन्हे दाखल आहेत. आरोपी हे लोणीकंद जिल्हा पुणे येथे असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने संयुक्त पोलीस पथकाने आरोपींचा शोध घेऊन त्यांना अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.