IND Vs ENG 5th Test – विक्रमवीर शुभमन गिल; 59 वर्षांपूर्वीचा विक्रम काढला मोडीत, सुनील गावसकरांनाही टाकलं मागे

Photo - BCCI

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये गुरुवारपासून (31 जुलै 2025) पाचवा आणि मालिकेतील शेवटचा कसोटी सामना ओव्हलमध्ये सुरू झाला आहे. टीम इंडियाने नाणेफेक गमावली असून इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेत कर्णधार शुभमन गिलचा खेळ चांगलाच बहरला आहे. त्याने चारही सामन्यांमध्ये आपला क्लास दाखवून दिला आहे. आतापर्यंत त्याने या मालिकेत 700 हून अधिक धावा चोपून काढल्या आहेत. तसेच सध्या सुरू असलेल्या ओव्हल कसोटीमध्येही त्याने एक धाव करताच 59 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.

ओव्हल कसोटीमध्ये टीम इंडियाची सुरुवात खराब झाली आहे. टीम इंडियाचे सलामीवीर यशस्वी जयस्वाल (2) आणि केएल राहुल (14) स्वस्तात माघारी परतल्याने 38 धावांवर 2 विकेट अशी टीम इंडियाची अवस्था झाली होती. परंतु कर्णधार शुभमन गिल (15*) आणि साई सुदर्शन (25*) यांनी संघाचा डाव सावरला असून टीम इंडियाने 72 धावांपर्यंत मजल मारली आहे. परंतु या सामन्यात फलंदाजीला आलेल्या कर्णधार शुभमन गिलने पहिली धाव करताच या कसोटी मालिकेत 723 धावांचा टप्पा पार केला आणि विक्रमाला गवसणी घातली. याचसोबत तो SENA देशांमध्ये कर्णधार म्हणून एकाच मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम गॅरी सोबर्सच्या नावावर होता. त्याने 1966 साळी इंग्लंड दौऱ्यावर असताना एकाच मालिकेत कर्णधार म्हणून खेळताना 722 धावा केल्या होत्या.

नाही म्हणजे नाही, लिजेंड्स लीगमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास हिंदुस्थानचा पुन्हा नकार

शुभमन गिलने या मालिकेत आपल्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर विविध विक्रम आपल्या नावावर केले आहेत. टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांचा विक्रम सुद्धा त्याने मोडीत काढला आहे. शुभमन गिल आता टीम इंडियाकडून खेळताना एकाच कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम सुनील गावसकर यांच्या नावावर होता. त्यांनी 1978-79 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना कसोटी मालिकेत कर्णधार असताना 732 धावा केल्या होत्या. आता या लिस्टमध्ये शुभमन गिलने पहिला क्रमांक पटकावला आहे.