क्रिकेटवारी – पुन्हा येरे माझ्या मागल्या!

>> संजय कऱ्हाडे

एकदम इंग्लिश वातावरण. ढगाळ, हवेत आर्द्रता अन् खेळपट्टीवर थोडंसं गवत आणि छान बाऊन्स! नाण्याची फेक. तशीच. कप्तान बदलला पण  इंग्लंडच्या बाजूनेच. फलंदाजी हिंदुस्थानची…

इथेही बदल नाही. यशस्वी, पुन्हा अयशस्वी. राहुलने पहिल्या कसोटीत केलेली चूक परत केली आणि वोक्सचा चेंडू स्टम्पवर ओढून घेतला. शरीराच्या जवळच्या चेंडूंना आडवी बॅट दाखवू नये असं म्हणतात. कप्तान शुभमन गिलने लॉर्ड्स कसोटीतल्या ऋषभ पंतची री ओढली. कदाचित चेंडू फक्त तटवून चोरटी धाव कशी घ्यायची हेच गिलला दाखवून द्यायचं होतं. शिवाय बेन स्टोक्सही बाहेर बसलेला होता. पण स्टोक्स नसला तर त्याची जागा घेणारेसुद्धा त्याच्याएवढेच चपळ आहेत हे अॅटकिन्सनने गिलला दाखवून दिलं! लॉर्ड्स कसोटीपासून स्टोक्सचा प्रभाव आपल्या मानगुटीवर किती बसला आहे पहा!

बाकी, साई सुदर्शन मान खाली घालून उभा ठाकला. त्याचा एक अप्रतिम सरळ ड्राईव्ह मात्र डोळय़ांना कमालीचा सुखावून गेला. पण त्याला जॉश टंगने चकवलं. तोपर्यंत सुमार गोलंदाजी करणाऱया टंगचा तो छान टप्प्यावरचा चेंडू साईला चकवून गेला.

पाचव्या कसोटीसाठी आज निवडला गेलेला हिंदुस्थानी संघ पाहून मात्र चक्रावलो. किंबहुना, हा सामना जिंपून मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधायची आहे की 1-2 अशाच निर्णयावर समाधान मानायचंय असा प्रश्नच पडला. गंमत म्हणजे बाद झालेल्यांची फलंदाजी बघता वाटलं, संघात अताक्त फलंदाज आहे तर आपण लवकर बाद झालो तरी चालेल, अशीच त्यांची समजूत होऊन गेलीय की काय म्हणता! मंडळी, 1-2 चं 1-3 व्हायला वेळ लागत नाही.

आता बाकीच्या फलंदाजांमध्ये हिंदुस्थानची नैया पार लावण्यासाठी चुरस लागेल. संधी समोर आहे. कसा कंबर, टिकवा तुमचा नंबर अन् लावा आपल्या नावावर शंभर!