सामना अग्रलेख – यवत कोणी पेटवले?

यवतमध्ये शांतता भंग करण्याचे काम करणारे सरकारमध्येच आहेत. समाज माध्यमांवर ‘स्टेटस’ ठेवून भावना भडकवल्याबद्दल संबंधित बाहेरच्या व्यक्तीवर कायद्याने कारवाई झालीच होती. पोलिसांनी कठोर पावले उचललीच होती व त्यालाच कायद्याचे राज्य म्हणतात. हे कायद्याचे राज्य उलथवून टाकण्यासाठी दोन आमदार बाहेरून आले व त्यांनी शांततेचा भंग केला. दौंडचे आमदार श्री. राहुल कुल हेदेखील भाजपचे (नवहिंदुत्ववादी). त्यामुळे या नवहिंदुत्ववाद्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचे सोडून दंगल भडकेल कशी यावरच लक्ष दिले. फडणवीस, अजित पवारांना मात्र प्रश्न पडलाय की शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जातीय सलोखा कोण बिघडवत आहे?

मोदी काळात भारतीय समाज कमालीचा (अ)संवेदनशील झाला, असंयमी बनला. हे चित्र देशाच्या एकतेसाठी बरे नाही. त्यामुळे दुसऱ्या समाजाचा, धर्माचा आदर करणे, एक दुसऱ्यांना समजून घेणे या भूमिकांना पायबंद बसला आहे. दौंड तालुक्यातील यवत येथे एका तरुणाने व्हॉटस्अॅपवर वादग्रस्त स्टेटस ठेवल्याचे निमित्त होऊन दोन गटांत धार्मिक दंगल उसळली. दगडफेक, जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. पोलिसांना दंगल आवरण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. 144 कलम लागू करावे लागले. महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्थेची परिस्थिती किती नाजूक व तकलादू आहे याचे ‘यवत’मधील दंगल हे उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत जे मतप्रदर्शन केले ते ‘चकित’ करणारे आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, ‘‘यवतमध्ये घडलेल्या घटनेची माहिती मी घेतली आहे. एका बाहेरील व्यक्तीने आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. लोक रस्त्यावर उतरले आणि गर्दीला नियंत्रित करण्यासाठी लाठीमार करावा लागला. काही लोक जाणूनबुजून तणाव निर्माण करण्यासाठी असे स्टेटस ठेवतात.’’ मुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया चकित करणारी आहेच, पण अनुभवी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दंगलीचे खापर एका तरुणाने ठेवलेल्या व्हॉटस्अॅप स्टेटसवर फोडले. अजित पवार म्हणतात, ‘‘परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. 144 कलम लावले आहे. हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. जातीय सलोखा ठेवणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे.’’ प्रश्न इतकाच येतो की, अजित पवार सांगतात त्याप्रमाणे शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात

दंगे कोण भडकवत

आहे? ते त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. सोशल मीडियावरील एका स्टेटसमुळे रस्त्यावर येऊन हजारो लोक दंगे करतात. महाराष्ट्रातील लोक इतके रिकामटेकडे कधीपासून झाले? याचा अर्थ तरुणांना रोजगार नाही, काम नाही, शेतीला उत्पन्न नाही. सारासार विचार करणे थांबले आहे. धर्माच्या बाबतीत येणाऱया सूचनांचे पालन करायचे व रस्त्यावर दंगे करायचे एवढेच काम लोकांना उरले. हे काही पुरोगामी, प्रगतशील महाराष्ट्राला शोभणारे नाही. यवतचा राडा हिंदू-मुसलमानांत झाला. त्यास जातीय वगैरे म्हणून लपवाछपवी का करायची? एका मुस्लिम तरुणाने समाज माध्यमांवर नक्की काय लिहिले व हिंदूंची माथी कशी भडकवण्यात आली, तेसुद्धा समजायला हवे. दंगलीला निमित्त ठरलेली ती बाहेरील व्यक्ती पोलिसांनी ताब्यात घेतली व त्याच्यावर कारवाई सुरू केली. पण एवढ्यावर थांबतील ते नवहिंदुत्ववादी कसले? अजित पवार गटाचे आमदार जगताप व भाजपचे आमदार पडळकर हे यवतमध्ये आले व त्यांनी लोकांना जास्तच भडकवले. त्यातून लोक रस्त्यावर उतरले व दंगल उसळली. त्यामुळे दंगल उसळवणाऱया बाहेरील व्यक्ती या सरकार पक्षाच्याच आहेत व तणाव वाढावा, हिंदू-मुसलमानांत दंगा पेटावा यासाठीच या बाहेरील व्यक्तींनी ‘यवत’मध्ये प्रवेश केला होता. अजित पवार म्हणतात त्याप्रमाणे शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा जातीय सलोखा बिघडवणाऱया माणसांत त्यांच्या पक्षाचाच आमदार आहे, हे काय उपमुख्यमंत्र्यांना कळत नाही? राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे व त्यांचेच लोक महाराष्ट्र पेटवायला निघाले आहेत.

विधानसभेच्या दारात

दंगली घडवणारे दंगलखोर यवतमध्येही दंगल करतात व मुख्यमंत्री म्हणतात, ‘‘मी यवतमधील दंगलीची माहिती घेत आहे.’’ मुख्यमंत्र्यांनी अर्बन नक्षलवाद्यांचा हिंसाचार रोखण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणला. यवतमधील दंगलखोरांवर हा अर्बन नक्षलवादाचा कायदा लावून अटका करायला हव्यात. नवहिंदुत्ववाद्यांनी मुसलमानांची घरे जाळली, दुकाने पेटवली, मशिदीवर दगडफेक केली. हे सर्व करायला उत्तेजन देणारे पडळकर, जगताप हे हिंदुत्ववादी कधीपासून झाले? पुन्हा या नवहिंदुत्ववाद्यांचे अनौरस बाप प्रे. ट्रम्प यांच्या पुढे शरणागती पत्करतात व पाकिस्तानविरुद्धचे ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवतात. प्रे. ट्रम्प यांनी डोळे वटारताच रशियाबरोबरची तेल खरेदी थांबवतात. हे यांचे शौर्य? पण जातीय तणाव निर्माण करून दंगली घडवण्यात या नवहिंदुत्ववाद्यांचे शौर्य मात्र उतू-मातू जात असते. यवतमधील ग्रामस्थांनी शांतता आणि संयम बाळगावा, असे श्री. अजित पवार म्हणतात ते खरेच आहे. पण यवतमध्ये शांतता भंग करण्याचे काम करणारे सरकारमध्येच आहेत. समाज माध्यमांवर ‘स्टेटस’ ठेवून भावना भडकवल्याबद्दल संबंधित बाहेरच्या व्यक्तीवर कायद्याने कारवाई झालीच होती. पोलिसांनी कठोर पावले उचललीच होती व त्यालाच कायद्याचे राज्य म्हणतात. हे कायद्याचे राज्य उलथवून टाकण्यासाठी दोन आमदार बाहेरून आले व त्यांनी शांततेचा भंग केला. दौंडचे आमदार श्री. राहुल कुल हेदेखील भाजपचे (नवहिंदुत्ववादी). त्यामुळे या नवहिंदुत्ववाद्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचे सोडून दंगल भडकेल कशी यावरच लक्ष दिले. फडणवीस, अजित पवारांना मात्र प्रश्न पडलाय की शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जातीय सलोखा कोण बिघडवत आहे?