
येत्या काही दिवसांत म्हणजेच सणासुदीच्या दिवसांत रिझर्व्ह बँक कर्जदारांना दिलासा देऊ शकते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका अहवालानुसार, 4 ते 6 ऑगस्टदरम्यान होणाऱया रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सची कपात करण्याची घोषणा केली जाऊ शकते.
एसबीआयच्या अहवालात म्हटले आहे की, ऑगस्टमध्ये व्याजदरात कपात झाल्यामुळे सणासुदीच्या काळात कर्जाची मागणी वाढेल आणि यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीला चालना मिळेल. याला त्यांनी ‘लवकर दिवाळी’ येण्यासारखं म्हटलं आहे. मागील आकडेवारीनुसार, दिवाळीपूर्वी रेपो दर कमी केल्याने सणासुदीच्या काळात कर्ज घेणाऱयांच्या संख्येत वाढ होते, असे दिसून आले आहे.
गृहकर्जाचे दर थेट रेपो दराशी जोडलेले असल्यामुळे रेपो दर कमी झाल्यास तुमचे गृहकर्ज स्वस्त होईल आणि तुमच्या ईएमआयवरही सकारात्मक परिणाम होईल.
कार लोन, पर्सनल लोन यांसारख्या कर्जांचे व्याजदरही कमी होऊ शकतात. कमी व्याजदरामुळे लोक घरे आणि गाडय़ा खरेदी करण्यासाठी कर्ज घेतात.
तीन वेळा रेपो कपात
2025 मध्ये आरबीआयने आतापर्यंत रेपो दरात तीन वेळा कपात केली आहे. फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये 25-25 बेसिस पॉइंट्सची कपात केली होती, तर जूनमध्ये त्यात 50 बेसिस पॉइंट्सची मोठी कपात करून तो 6 टक्क्यांवरून 5.50 टक्क्यांवर आणला होता. आता ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा कपात झाली तर तो 5.25 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो. यामुळे कर्ज घेणाऱयांसाठी हा मोठा दिलासा असेल.