
मुंबई शहरातील कबुतरखान्यांचा वाद चिघळला आहे. पालिकेने दादरच्या कबुतरखान्यावरही कारवाई सुरू केल्याने जैन समाज आक्रमक झाला आणि रविवारी शांतिदूत यात्रा काढून पालिकेच्या कारवाईचा निषेध करण्यात आला. आधी विलेपार्लेतील मंदिर तोडले आणि आता आमच्या धार्मिक हक्कांवर गदा आणली जातेय, असा आरोप करीत जैन धर्मगुरूंनी संताप व्यक्त केला.
उच्च न्यायालयाच्या निर्देशाला अनुसरून पालिकेने कबुतरखान्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शुक्रवारी रात्री पालिकेचे पथक दादरचा कबुतरखाना तोडण्यासाठी गेले होते. त्यावरून वादंग उठले असून जैन समाजाच्या धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या आहेत. त्याच अनुषंगाने जैन समाजाच्या लोकांनी दादरच्या कबुतरखान्याचे पाडकाम करण्याच्या कारवाईला विरोध केला. त्यामुळे मोठा पोलीस फौजफाटा असूनही पालिकेला कबुतरखाना तोडता आला नाही. नंतर पालिकेने शनिवारी संध्याकाळी ताडपत्री लावून दादर कबूतरखाना बंद केला आणि धान्य घालण्यासही मनाई केली. जर कोणी धान्य टाकताना आढळला, तर त्याच्यावर गुन्हा नोंदवला जाईल, असा इशारा पालिकेने दिला. कबुतरखान्याच्या भागातील पत्रे व इतर गोष्टीदेखील हटवण्यात आल्या. त्या कारवाईच्या निषेधार्थ रविवारी सकाळीच जैन समाज बहुसंख्येने रस्त्यावर उतरला आणि शांतीदूत यात्रा काढून पालिकेच्या कारवाईला विरोध केला. पालिकेचे धोरण अन्यायकारक आहे. प्रशासन आमच्या धार्मिक हक्कांवर गदा आणतेय, असा संताप जैन समाजाच्या लोकांनी व्यक्त केला. पालिका प्रशासन आणि महायुती सरकारने कबुतरखान्यावरील कारवाईमागील आपली नेमकी भूमिका काय आहे ते स्पष्ट करावे, अशी मागणी जैन समाजाने केली आहे. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे कबुतरखान्यावरील कारवाईचा वाद चिघळला आहे. रविवारी हजारो देशभक्तांनी राष्ट्रीय क्रांतिकारी संत नीलेश चंद्र विजय यांच्या नेतृत्वाखाली कुलाबा जैन मंदिर ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढला.
कारवाईच्या वादात लोढांनी घेतली उडी
पालिकेच्या कारवाईविरोधात तीव्र पडसाद उमटू लागले असतानाच भाजपचे आमदार, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वादात उडी घेतली. त्यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहिले आणि कबुतरखान्यांवर बंदी घालण्याची मागणी केली. खाद्याअभावी कबुतरांच्या होणाऱ्या मृत्यूंकडे पत्राद्वारे आयुक्तांचे लक्ष वेधले. तसेच कबुतरखान्यांसाठी आरे कॉलनी, वांद्रे-कुर्ला संकुल, रेसकोर्स अशा विविध मोकळ्या पर्यायी जागांचा पर्याय सुचवला आहे. जनभावनेची दखल घेऊन सुवर्णमध्य काढा, असे आवाहन लोढा यांनी पालिका आयुक्तांना केले आहे.
भाजपच्या राजवटीतील अत्याचार सहन करणार नाही!
भाजपला मतदान करा असे म्हणणारे जैन संत आता कुठे आहेत? भाजपच्या राजवटीत मूक प्राण्यांवरील अत्याचार देशभक्त सहन करणार नाहीत, असा इशारा मुनी नीलेश चंद्र यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना दिला. 7 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयात कबुतरखान्यांसंबंधी सुनावणी आहे. त्यावेळी जर कबुतरखान्यांविरोधात निकाल आला तर अन्न-पाणी सोडून उपोषण करेन, असा पवित्रा नीलेश चंद्र यांनी जाहीर केला. मोर्चामध्ये नीलेश चंद्र, हार्दिक हुंडिया, पूरण दोशी, रमेश शाह, मोहन माळी आदी प्रमुख व्यक्तींसह अनेक जैन संत आणि हजारो प्राणीप्रेमी सहभागी झाले होते.
आधी चरस, गांजा, अफूवर बंदी घाला!
कबुतरांची विष्ठा व पिसांमुळे श्वसनाचे आजार होतात. रहिवाशांच्या आरोग्याला हा धोका असल्याचे सांगून पालिका कारवाई करतेय. मग चरस, गांजा, अफू या गोष्टी प्रशासनाला दिसत नाहीत का? त्या आधी बंद करा, असे आवाहन जैन समाजाच्या धर्मगुरूंनी केले.