सरकारच्या मनात नेमकं आहे काय? मोदी-शहांच्या राष्ट्रपती भेटीमुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी स्वतंत्रपणे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. अचानक झालेल्या या भेटीगाठींमागे नक्कीच काहीतरी मोठा अर्थ दडला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. समान नागरी कायदा, उपराष्ट्रपतींची निवड की जम्मू कश्मिरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची घोषणा याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.

हिवाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा उद्यापासून सुरू होत आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड व ऑपरेशन सिंदूरमुळे पहिले दोन आठवडे गाजले. त्यामुळे तिसऱ्या आठवडय़ाची उत्सुकता आहे. मोदी-शहांच्या राष्ट्रपती भेटीमुळे ही उत्सुकता वाढली आहे. गेल्या 11 वर्षांत सरकारमधील दोन सर्वोच्च नेते राष्ट्रपतींना अशा प्रकारे क्वचितच भेटले आहेत. नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीबाबत ही भेट झाल्याची शक्यता असू शकते, असे बोलले जाते आहे. तर, भाजपच्या अजेंडय़ावर असलेल्या समान नागरी कायद्याचे विधेयक या आठवडयात केंद्र सरकारकडून आणले जाईल अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे.

5 ऑगस्ट महत्त्वाचा का?

मोदी सरकारच्या कार्यकाळावर नजर टाकल्यास 5 ऑगस्ट या दिवसाचे महत्त्व अधोरेखित होते. 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने कश्मीरमधील अनुच्छेद 370 हटवण्याचा निर्णय जाहीर केला होता, तर 5 ऑगस्ट 2020 रोजी राम मंदिराची पायाभरणी झाली होती. जम्मू-कश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी सरकारवर दबाव आहे. उद्या 5 ऑगस्ट असल्याने संसदेत विरोधक यावरून आक्रमक होण्याचा अंदाज आहे. विरोधकांना ती संधी देण्याआधीच निर्णय घेण्याची सरकारची रणनीती असू शकते, त्यामुळे उद्याच्या दिवसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.