
पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात हिंदू-मुस्लिम दंगे पेटवून गोध्रा घडवण्याचा भाजपचा डाव होता, असा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात देशभरात मोठ्या राडकीय घडामोडी घडणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. सध्या आपल्या देशात राष्ट्रपतींचे अधिकार काय आहेत, हे आपल्याला माहिती आहे. तसेच राष्ट्रपतींच्या सल्लानुसार सरकार किती काम करते, हेदेखील आपल्याला माहिती आहे. आज राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचीही महत्त्वाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत भविष्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर महिन्यात देशात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतील, असे सातत्याने सांगितले जात आहे. आपल्या माहितीप्रमाणे सप्टेंबर महिन्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. पंतप्रधान, गृहमंत्री यांनी राष्ट्रपतींना भेटणे हा त्यांच्या कामाचा भाग आहे. ते राष्ट्रपतींकडे जातात, ते राष्ट्रपतींना भेटायला बोलवत नाहीत, हे महत्त्वाचे आहे. देशातील कामकाजाच्या पद्धती पाहता काहीही होऊ शकते, असा टोलाही त्यांनी हाणला.
पहलगाम हल्ल्यानंतर देशात गोध्रासारखी मोठी दंगल घडवण्याचा भाजपचा डाव होता. मात्र, पीडीतांच्या कुटुंबियांनी भाजपचा डाव उधळून लावला. त्याबाबत त्यांचे अभिनंदन करतो. देशात पुन्हा हिंदू मुसलमान असा संघर्ष भाजपला करायचा होता. मात्र, जनतेने त्यांचा डाव उधळून लावला. देशात आता निवडणूक आयोग नसून तो चुना लगाव आयोग झाला आहे. बिहारमध्येही मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. आम्ही त्याबाबत आवाज उठवत आहोत, असेही त्यांनी सांगितले. दहशतवादाला कोणताही रंग नसतो. मात्र, काही लोकांकडून दहशतवादही रंगवण्यात येत आहे. दहशतवाद हा दहशतवाद असतो. त्याला जातीधर्म काहीही नसतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इंडिया आघाडीची बैठक 7 तारखेला संध्याकाळी आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी या बैठकीचे निमंत्रित आहेत. राहुल गांधी यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिल्लीत येण्याचा आग्रह केला. या बैठकीला उद्धव ठाकरे 6 तारखेला दिल्लीत येणार आहेत. तसेच 8 तारखेपर्यंत दिल्लीत असतील. 7 तारखेच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. संसद भवनातील पक्ष कार्यालालाही ते भेट देणार आहेत.