
रत्नागिरी तालुक्यात एलपीजी गॅस वाहतूक करणाऱ्या टॅंकरच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी सकाळी 6 वाजता मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा गावात भरधाव वेगाने येणाऱ्या एलपीजी गॅस टॅंकरने रस्त्याशेजारी टपऱ्यांना उडवले. तर दुसरी घटना निवळी-गणपतीपुळे रस्त्यावर घडली. या ठिकाणी एलपीजी टॅंकर उलटून अपघात झाला आहे. सुदैवाने त्या टॅंकरमधून वायुगळती झाली नाही.चार दिवसांपूर्वीच झालेल्या अपघातानंतर सोमवारी पुन्हा दोन गॅस टॅंकरचा अपघात झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अपघाताच्या घटना वाढल्याने ग्रामस्थ आता ‘गॅसवर’ आहेत.
एलपीजी गॅस भरून गोव्याकडे जाणाऱ्या टॅंकरचालकाचे वाहनावरचे नियंत्रण सुटून हा टॅंकर रस्त्याशेजारी असलेल्या टपऱ्यांना आणि दुचाकींवर जाऊन आदळला. या अपघातानंतर हातखंबा येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. एलपीजी गॅस टॅंकरच्या सतत होणाऱ्या अपघातामुळे आमच्या जीवाला धोका असल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला.
एलपीजी गॅस टॅंकरचा आणखी एक अपघात निवळी-गणपतीपुळे रस्त्यावर झाला आहे.एलपीजी गॅस वाहतूक करणारा टॅंकर रस्त्याच्या कडेला उलटला आहे.सुदैवाने या टॅंकर मधून वायुगळती झाली नाही. जून महिन्यात झालेल्या गॅस टॅंकर अपघातानंतर वायुगळती होऊन आग लागली होती. त्यावेळी महामार्ग 17 तास बंद होता. त्यानंतर मागील आठवड्यात मंगळवारी गॅस टॅंकर उलटून झालेल्या अपघातात वायुगळती झाल्याने वाहतूक 14 तास ठप्प होती. सातत्याने होणाऱ्या या अपघातामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.