टीम इंडियाच्या परफॉर्मन्ससाठी दहा पैकी दहा, अक्षरश: अंगावर शहारे आले; सचिन तेंडुलकरने केले कौतुक

टीम इंडियाने पाचव्या कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवत पाच कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत सोडवली. इंग्लंड हा सामना जिंकेल अशी परिस्थिती असताना मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णाने धारदार गोलंदाजी करत इंग्लंडकडून विजय खेचून आणला. टीम इंडियाच्या या विजयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने देखील ट्विटरवरून टीम इंडियाचे कौतुक केले आहे. सचिनने मोहम्मद सिराजचा व टीम इंडियाचा जल्लोष करतानाचा असे दोन फोटो शेअर करत त्या सोबत एक पोस्ट लिहली आहे. ”कसोटी क्रिकेट… अक्षरश: शहारे आले. मालिका 2-2, परफॉर्ममन्स 10 पैकी 10… टीम इंडियाचा सुपरमॅन… काय जबरदस्त जिंकलोय’, अशा मोजक्या शब्दात सचिनने त्याचा आनंद व्यक्त केला.

गाबापेक्षाही मोठा विजय – सुनील गावस्कर

ओव्हल मैदानावरील थरारक आणि ऐतिहासिक यशाबद्दल माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी याला 2021 मधील ‘गाबा विजयापेक्षाही मोठा’ असे वर्णन केले. त्या वेळेस ऑस्ट्रेलियाला हिंदुस्थानने हरवले होते. तसेच टीम इंडियाने हा सामना जिंकावा म्हणून सुनील गावस्कर हे त्यांचे लकी जॅकेट घालून कॉमेन्टरी करत होते.