Ratnagiri News – एलपीजी गॅस टॅंकरना ताशी 20 किमीचा वेगमर्यादा, अपघातानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांचा निर्णय

एलपीजी गॅस टॅंकरचा ताफा सुरक्षित अंतरावर ठेऊन टॅंकरचा वेग कमाल 20 किमी असावा.चालकाने दारू पिऊन गाडी चालवू नये अशा सक्त सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आज गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. मुंबई-गोवा महामार्गावर सतत होणाऱ्या अपघातानंतर आज एक महत्वपूर्ण बैठक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात घेण्यात आली.

याबैठकीला गॅस कंपनीचे अधिकारी, मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचे ठेकेदार,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी,उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुंबई-गोवा महामार्ग अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिल्या.त्यामध्ये चालकांना योग्य प्रशिक्षण द्यावे, चालकांची वैद्यकीय तपासणी करावी,गाडी चालवताना मोबाईल वापरू नये, दारू पिऊन गाडी चालवू नये.चालकांना गणले द्यावा, चालकाला सहाय्यक असावा, चालकाची थकवा चाचणी घ्यावी. हातखंबा येथे बचाव वाहन ठेवणे.बचाव पथकाला प्रशिक्षण देणे अशा सूचना गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाला रस्त्यावर सुरक्षा चिन्ह,रस्त्यांचे जलद बांधकाम, गतिरोधकाचा वापर, चालकांसाठी नियमित शिबिरे आयोजित करावीत. टॅंकरची अचानक तपासणी करावी, क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करणे अशा सूचना नितीन बगाटे यांनी दिल्या.