‘तारीख पे तारीख’ला कंटाळून गुन्हा कबूल, दीडशे रुपयाच्या घड्याळ चोरीप्रकरणी 49 वर्षांपासून कोर्टात चकरा

1976 साली 150 रुपये किमतीची घड्याळ चोरी केल्याप्रकरणी गेल्या 49 वर्षांपासून कोर्टातील सुनावणीसाठी उपस्थित राहणाऱ्या व्यक्तीला नुसती ‘तारीख पे तारीख’ मिळत होती. याला वैतागून या वृद्ध व्यक्तीने कोर्टात गुन्हा कबूल केला आहे. गुन्हा कबूल करताना या व्यक्तीने कोर्टात म्हटले की, कोर्टातील सुनावणीच्या प्रत्येक तारखेला येऊन आता थकलो आहे.

तरुण होतो तर येत होतो, परंतु आता वय झाले आहे. हे सर्व झेपत नाही. यापुढे मी ही केस लढू शकत नाही. त्यामुळे मी गुन्हा कबूल करत आहे. कन्हैया लाल असे या व्यक्तीचे नाव असून त्यांचे वय आता 68 वर्षे झाले आहे. 1976 साली कन्हैया लाल सहकारी समितीमध्ये शिपाई म्हणून कामाला होते. या प्रकरणाची कोर्टात केस सुरू झाली. दर महिन्याला ‘तारीख पे तारीख’ पडू लागली. बरीच वर्षे हा खटला कोर्टात सुरू राहिला.

दोन हजार रुपयांचा दंड

कन्हैया लाल यांनी कोर्टाच्या ‘तारीख पे तारीख’ला कंटाळून अखेर चोरीचा गुन्हा कबूल केला. त्यांनी कोर्टाला विनंती केली की, माझे वय झाले आहे. मी याआधी कारावासाची शिक्षाही भोगली आहे. त्यामुळे कोर्टाने या माझ्या बाजू विचारात घ्याव्यात. झांशीच्या न्यायदंडाधिकाऱ्याने कन्हैया लाल यांना दोषी ठरवले. कन्हैया लाल यांनी याआधी तुरुंगवासाची शिक्षा भोगली म्हणून कोर्टाने त्यांना दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला.