
हिंदुस्थानात महाग मिळणारे अॅपलचे मॅकबुक प्रो लॅपटॉप व्हिएतनाममधून स्वस्तात खरेदी केले जाऊ शकते. एवढेच नव्हे तर वाचलेल्या पैशांतून स्वस्तात मस्त अशी आंतरराष्ट्रीय सहलही होऊ शकते. एका रेडिट युजरने याबाबतचा स्वतःचा अनुभव शेअर केला आहे.
संबंधित व्यक्तीने व्हिएतनामची राजधानी हनाईची टूर केली. हिंदुस्थानच्या मार्केटमध्ये अॅपल प्रोडक्टवर लागणारे आयात शुल्क, जीएसटी आणि प्रिमियमच्या किमतीतून बचत व्हावी म्हणून या व्यक्तीने हनोईला जायचे ठरवले. त्याने सर्वात किफायतशीर राऊंड ट्रीप फ्लाईट बुक केली. तिथे पोचल्यावर मॅकबुक प्रो लॅपटॉपसाठी त्याने मॅकबुक डीलच्या 15हून अधिक स्टोरला भेट दिली. जास्तीत जास्त बचत करण्यासाठी व्हॅट (मूल्यवर्धित कर) कागदपत्रांची काळजीपूर्वक चौकशी करण्याचा सल्ला त्याने नेटीजन्सला दिला आहे. या धोरणात्मक दृष्टिकोनाचा त्याला चांगला फायदा झाला. हिंदुस्थानात समान्यतः 1.85 लाख रुपयांना मिळणारा मॅकबुक प्रो त्याला व्हिएतनामध्ये व्हॅट परतावा मिळाल्यानंतर फक्त 1.48 लाख रुपयांना पडला. म्हणजे 36 हजार 500 रुपयांची बचत झाली.
पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
या हिंदुस्थानी व्यक्तीला 11 दिवसांचा पूर्ण टुरचा (ज्यामध्ये राहण्याचा खर्च, मॅकबुकची खरेदी (रिफंडनंतरची रक्कम) आणि विमानाचा खर्च समाविष्ट आहे ) मिळून 1 लाख 97 हजार रुपये खर्च झाला. यातून मॅकबुकची किंमत 1.48 लाख वजा केली तर सहलीचा खर्च फक्त 48 हजार रुपये झाला. रेडिट युजरचा हा अनुभव चांगलाच व्हायरल होत आहे. महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सहली उपयुक्त ठरत आहेत, या पोस्टवर सोशल मीडियातून नेटकरी जोरदार चर्चा करत आहेत.