गंदा है पर धंदा है… भिकाऱ्यांची संख्या 4 कोटीपर्यंत, पाकिस्तानात सहावी व्यक्ती भिकारी

पाकिस्तानात भीक मागणे हा महत्त्वाचा धंदा बनला आहे. पाकिस्तानची एकूण लोकसंख्या 23 कोटी आहे आणि त्यापैकी सुमारे 4 कोटी लोक भीक मागतात. म्हणजेच पाकिस्तानातील प्रत्येक सहावी व्यक्ती भीक मागते.

पाकिस्तानी लोक केवळ त्यांच्या देशातच नव्हे, तर परदेशातही हे काम करत आहेत. 3.8 कोटी लोक काहीही न करता दरवर्षी 42 अब्ज डॉलर्स कमवत आहेत. याचा थेट परिणाम देशातील उर्वरित लोकसंख्येवर होत आहे आणि जे महागाई वाढण्यामागचे कारण आहे. पाकिस्तानमधील बिझनेस अँड सोसायटी सेंटरच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, देशात भीक मागण्याची प्रवृत्ती वाढत आहे. कारण यात काम न करता जास्त कमाई होतेय.

एशियन ह्युमन राईट्स कमिशनच्या अहवालानुसार, पाकिस्तानच्या लोकसंख्येपैकी 2.5 ते 11 टक्के लोक उपजीविका करण्यासाठी भीक मागत आहेत. एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या आकडेवारीनुसार, देशातील प्रमुख शहरी केंद्रांच्या रस्त्यावर सुमारे 12 लाख मुले फिरतात.

विदेशातून येताहेत तक्रारी

पाकिस्तान सरकारने रस्त्यावर भीक मागण्यासाठी परदेशात जाणाऱ्या लोकांचा डेटा गोळा केला आहे. परदेशात पकडलेले 90 टक्के भिकारी पाकिस्तानी वंशाचे असल्याचे आकडेवारीवरून समोर आलेय. पाकिस्तान सरकारने धार्मिक तीर्थयात्रेच्या नावाखाली आणि भीक मागण्याच्या नावाखाली सौदी अरेबिया, इराक आणि इराणसारख्या देशांमध्ये जाणाऱ्या हजारो भिकाऱ्यांचे पासपोर्ट निलंबित केले आहेत. गेल्या अडीच वर्षांत सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांमधून 44 हजार भिकाऱयांना पाकिस्तानला परत पाठवण्यात आले आहे.

भिकाऱ्यांची अब्जोंची कमाई

पाकिस्तानची लोकसंख्या 23 कोटी आहे, त्यापैकी 3.8 कोटी व्यावसायिक भिकारी आहेत. एका भिकाऱ्याचे राष्ट्रीय सरासरी उत्पन्न दररोज 850 पाकिस्तानी रुपये आहे. या भिकाऱ्यांना दररोज 32 अब्ज रुपये भीक मिळत असल्याचं म्हटलं जातं, जे दरवर्षी 117 ट्रिलियन रुपये आहेत. अमेरिकन डॉलरमध्ये पाकिस्तानी भिकाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 42 अब्ज डॉलर आहे. जगातील मुस्लिम देशामध्ये पाकिस्तानी लोक मोठ्या प्रमाणात जात असून या ठिकाणी भीक मागताना पकडले आहेत. तसेच त्यांच्यावर कारवाईही करण्यात आलेली आहे.