
नागालँडचे मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्मोहोनलुमो किकोन यांनी बुधवारी पक्षाचा राजीनामा दिला. सार्वजनिक जीवनात नवीन संधी शोधण्याच्या वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईशान्येकडील आदिवासी समुदायाशी संबंधित प्रश्नांवर पक्षाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने किकोन नाराज होते. किकोन यांचा राजीनामा हा ईशान्येकडील राज्यांमध्ये, विशेषतः आदिवासी पट्ट्यात भाजपसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.
मात्र असे असले तरी किकोन यांच्या राजीनाम्यावर भाजपच्या अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
भंडारी विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा आमदार असलेले आणि हिंदुस्थानच्या ईशान्यकडील राज्यातील भाजपचे महत्त्वाचे नेते असलेल्या किकोन यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे की, ‘सार्वजनिक सहभाग आणि धोरणात्मक कामासाठी नवीन मार्ग शोधण्याची इच्छा’ असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
भाजपसोबत काम करताना मिळालेल्या संधी आणि जबाबदाऱ्यांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. विविध पदांवर काम करण्याची आणि पक्षाच्या वाढीसाठी योगदान देण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
‘माझा हा निर्णय सार्वजनिक सहभाग आणि धोरणात्मक कामासाठी नवीन संधी शोधण्याच्या गरजेतून घेतला आहे, ज्यामुळे मला समाजासाठी नव्या पद्धतीने योगदान देता येईल, असा मला विश्वास आहे,’ असे किकोन यांनी सांगितले.
किकोन हे प्रादेशिक आणि आदिवासी प्रश्नांवर स्पष्टपणे भूमिका मांडण्यासाठी ओळखले जातात. ईशान्येकडील राज्यांच्यासंदर्भात भाजपच्या धोरणात्मक निर्णयांमधे त्यांची महत्त्वाची भूमिका होती.