
एकहाती सामना फिरवण्याची क्षमता असलेला मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर हिंदुस्थानच्या टी-20 आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमनाच्या उंबरठय़ावर आहे. आगामी आशिया कप स्पर्धेसाठी (यूएई) या 30 वर्षीय खेळाडूला पुन्हा संधी देण्याची निवड समितीची तयारी असल्याची माहिती मिळाली आहे. अय्यरच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे.
अय्यरने शेवटचा टी-20 सामना डिसेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता, तर फेब्रुवारी 2024 मध्ये विशाखापट्टणम येथे इंग्लंडविरुद्ध त्याने शेवटची कसोटी खेळली होती. त्यानंतर तो एकदिवसीय स्वरूपातच संघाचा मुख्य घटक राहिला. 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताना त्याने पाच सामन्यांत 243 धावा करून संघातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून आपली छाप पाडली.
आयपीएल 2025 हंगामात पंजाब किंग्जकडून त्याच्या कामगिरीने त्याची किंमत अधिक वाढवली. मेगा लिलावात तब्बल 26.75 कोटींना विकत घेतलेल्या अय्यरने नेतृत्वगुण, दबावाखाली आक्रमक फटकेबाजी आणि संयम यांचे उत्तम मिश्रण दाखवले होते. त्याचे पुनरागमन ही संघासाठी आनंदाची बाब असली तरी आशिया कपात हिंदुस्थानला ऋषभ पंतशिवायच खेळावे लागणार आहे. मँचेस्टर कसोटीत इंग्लंडविरुद्ध खेळताना पंतच्या पायाच्या बोटाला प्रॅक्चर झाले असून तो किमान सहा आठवडे मैदानाबाहेर राहणार आहे. त्यामुळे तो वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतही खेळू शकणार नाही. सकारात्मक बाब म्हणजे त्याला शस्त्रक्रियेची गरज नाही, मात्र त्याची अनुपस्थिती हिंदुस्थानच्या खालच्या मधल्या फळीत मोठी पोकळी निर्माण करू शकते.