ब्रिस्बेनवरचाच ‘महा’ विजय, सबा करीमचा दावा

Photo - BCCI

इंग्लंडविरुद्ध ओव्हलवर मिळवलेल्या विजयाने सारेच भारावले आहेत. अनेकांनी हा आजवरचा महाविजय असल्याचे कौतुकही केलेय. पण हिंदुस्थानचा माजी कसोटीपटू सबा करीमच्या मते ओव्हल नव्हे, तर 2021 मधील बॉर्डर-गावस्कर मालिकेत गॅबावर (ब्रिस्बेन) ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेला तीन विकेट्सचा विजय अधिक प्रभावी होता. त्या विजयानंतर हिंदुस्थान हा 32 वर्षांत ब्रिस्बेनमध्ये कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करणारा पहिला संघ ठरला होता. त्यामुळे ओव्हलपेक्षा ब्रिस्बेनवरचा महाविजय आहे.

ओव्हलवरील विजय हिंदुस्थानी चाहत्यांच्या आठवणीत अनेक वर्षे राहील, पण गॅबावरचा विजय त्याच्यापेक्षा संस्मरणीय आहे. ऑस्ट्रेलियात यापूर्वी असे कधी घडले नव्हते आणि तेही अत्यंत तरुण संघासोबत, ज्यातील बहुतांश नियमित खेळाडू दुखापतीमुळे बाहेर होते. हिंदुस्थानसाठी अशा प्रकारचा विजय अविश्वसनीय होता. एखाद्या संघाची खरी प्रगती तेव्हा दिसते, जेव्हा एक-दोन मुख्य खेळाडू अनुपस्थित असतानाही संघ उत्तम कामगिरी करतो आणि सामने जिंकतो, असे सबा म्हणाला.