धर्माविरोधात जाल तर कोर्टालाही जुमानणार नाही प्रसंगी शस्त्र हातात घेऊ! कबुतरखान्यांसाठी जैन मुनी आक्रमक, बुधवारपासून उपोषणाचा इशारा

मुंबईतील कबुतरखान्यांच्या मुद्दय़ावरून अहिंसावादी जैन समाज आक्रमक झाला आहे. कबुतरखान्यांवरील बंदीविरोधात 13 ऑगस्टपासून जैन समाजबांधव उपोषणाला बसणार आहेत. देशभरातील दहा लाख जैन बांधव या उपोषणात सहभागी होणार आहेत. वेळ पडल्यास शांतताप्रिय, अहिंसावादी जैन समाज धर्मासाठी शस्त्रही हाती घेईल आणि न्यायालयाच्या आदेशालाही जुमानणार नाही, असा इशारा या आंदोलनाची घोषणा करताना जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांनी दिला आहे.

मुंबईतील कबुतरखान्यांमध्ये पक्ष्यांना खाद्य टाकण्यास घातलेली बंदी उच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर जैन समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या आदेशानंतरही जैन बांधवांनी दादर येथील कबुतरखान्याजवळ आंदोलन करत कबुतरांना खाद्य घातले होते. पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना रोखले होते. त्यामुळे जैन समाज अधिक आक्रमक झाला आहे.

जैन समाज आता सत्याग्रह आणि उपोषणाचा मार्ग वापरणार आहे. जैन समाज शांतताप्रिय, अहिंसावादी आहे. शस्त्र उचलणे हा आमचा स्वभाव नाही, पण धर्माविरोधात पाऊल उचलले गेले तर आम्ही गप्प बसणार नाही. देशाचे संविधान, न्यायालय आणि सरकारला आम्ही मानतो, परंतु आमच्या धार्मिक तत्त्वांवर गदा आणली तर आम्ही कोणालाही अगदी न्यायालयालाही मानणार नाही, धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र उचलण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असे नीलेशचंद्र विजय म्हणाले. कबुतरखान्यावरील बंदीचा निर्णय राजकीय हेतूने आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला गेल्याचा आरोप नीलेशचंद्र विजय यांनी केला आहे. जीवदया हा जैन धर्माचा मूलभूत सिद्धांत आहे. मुंगीपासून हत्तीपर्यंत कुठल्याही जिवाचा वध होऊ नये, असे जैन धर्मात सांगितले आहे. मग जैन धर्मालाच का लक्ष्य केले जात आहे? असा सवालही त्यांनी केला. दारू आणि मांसाहारामुळे किती लोक मरतात हेही दाखवा, असेही नीलेशचंद्र विजय प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

कबुतरखान्यावर पुन्हा ताडपत्री

पक्षीप्रेमी आणि जैन समाजाच्या आंदोलनावेळी दादरच्या कबुतरखान्यावरील ताडपत्री आणि बांबू उखडण्यात आले होते. महापालिकेने रविवारी रात्री हा कबुतरखाना पुन्हा ताडपत्रीने झाकला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता.

कबुतरांना खाद्य टाकणाऱयांकडून 68 हजारांचा दंड वसूल

न्यायालयाच्या बंदीनंतरही कबुतरांना खाद्य घालणाऱयांकडून 13 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत 68 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महानगरपालिकेने अशी 142 प्रकरणे नोंदवली असून सर्वाधिक दंड दादर कबुतरखान्याजवळ गोळा करण्यात आला आहे. तिथे 51 व्यक्तींकडून 22 हजार 200 रुपये दंड वसूल करण्यात आला.