
छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या आणि शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीत स्थान मिळवून देणाऱ्या महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला मात्र काळोखात ठेवले आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या किल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी यांचा समावेश आहे. तसेच तामीळनाडूतील जिंजी किल्ल्याचाही समावेश आहे. याचा सरकारने मोठा गाजावाजा केला, पण दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा गेल्या अनेक दिवसांपासून काळोखात आहे. या पुतळ्याच्या परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. मात्र ही रोषणाई आणि दिवे अनेक दिवसांपासून बंद असून शिवरायांचा पुतळा काळोखात आहे. या पुतळ्याची आणि परिसराची देखभाल राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आणि महापालिकेच्या वतीने केली जाते. पण पुतळ्याच्या देखभालीकडे सतत दुर्लक्ष होत आहे. स्थानिक नागरिक आणि शिवप्रेमींकडून याबद्दल तीव्र नाराजी आहे.
> छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यानंतर भाजपने शिवाजी पार्कमध्ये याचा मोठा गाजावाजा करीत मोठा समारंभ केला होता. मात्र त्यानंतर पुतळ्याच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
> या शिवरायांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे शिल्प आहे. मध्यंतरी या शिल्पालाही मोठे भगदाड पडले होते. त्यासंदर्भातील वृत्त दैनिक ‘सामना’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची तातडीने दुरुस्ती झाली होती. पण आता पुन्हा या पुतळ्याच्याच स्वच्छतेपासून देखभालीकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला या पुतळ्याला शासनाच्या वतीने पुष्पहार अर्पण केला जातो. या कार्यक्रमाच्या एक-दोन दिवस अगोदर पुतळ्याची स्वच्छता होते. त्यानंतर मात्र पुतळ्याच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले जात नाही, अशी स्थानिकांची तक्रार आहे.