
निवडणूक आयोगाने देशातील मुक्त व निष्पक्ष निवडणूक उद्ध्वस्त केली, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला. आयोगाकडून देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावण्याचा प्रकार अत्यंत लज्जास्पद आहे, असेही ते म्हणाले.
विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावण्यापेक्षा आयोगाने मतदानचोरीबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. निवडणूक आयोग स्वतःला सर्वोच्च न्यायालयापेक्षाही वरचा मानत आहे. बिहारमधून ज्या व्यक्तींची नावे मतदार यादीतून वगळली गेली त्यांची नावे सादर करणार नाही असे आयोगाने सांगितले. त्या व्यक्तींना मतदानाचा हक्क नाही काय, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
आयोग काय लपवतोय?
आयोगाने बिहारची डिजिटल मशीनने वाचता येईल अशी मतदारांची यादी हटवून त्याऐवजी स्कॅन केलेली यादी अपलोड केली आहे. त्यासंदर्भातील बातमी आदित्य ठाकरे यांनी शेअर केली आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या हिंदुस्थानचा निवडणूक आयोग निवडणूक घोटाळ्याला परवानगी दिल्याबद्दल रंगेहाथ पकडला गेल्यानंतर आता आपली बाजू सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय. निवडणूक आयोग काय लपवतोय? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.