
वक्तशीरपणासाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांची हक्काची सुसज्ज वास्तू अर्थात ‘डबेवाला भवन’चे लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. वांद्रे येथे ‘डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र’ नावाने ही इमारत उभारली आहे. या वास्तूच्या माध्यमातून मुंबई आणि डबेवाले यांच्यातील नात्याचा इतिहास पर्यटकांपुढे सदैव उभा राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भवनचे उद्घाटन केले जाणार आहे.
वांद्रेतील ‘डबेवाला भवन’ अत्याधुनिक बनवण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने यापूर्वीही डबेवाल्यांच्या योगदानाचा गौरव केला आहे. त्याच हेतूने हाजी अली येथील केशवराव खाडे मार्गावर डबेवाल्यांचा पुतळा उभारण्यात आला. त्याचबरोबर भायखळा रेल्वे स्थानक परिसरातील एस ब्रिजजवळ डबेवाला कामगारांचे नेते पै. गंगाराम तळेकर यांच्या नावाचा चौक आहे. या दोन स्मारकांच्या यादीत आता डबेवाल्यांच्या इतिहासाला उजाळा देणारी वास्तू असलेल्या आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राची भर पडणार आहे. याबाबत डबेवाले समाधान व्यक्त करीत आहेत.
डबेवाल्यांसाठी अभिमानास्पद!
डबेवाला आंतरराष्ट्रीय भवन केंद्रामध्ये डबेवाल्यांच्या इतिहासाला उजाळा देणाऱ्या अनेक कलाकृतींचा समावेश केलेला आहे. बहुतांश डबेवाले हे पुणे जिह्यातील खेड तालुक्याच्या पश्चिम पट्टय़ातील आहे. या डबेवाल्यांना मुंबई महापालिकेने योग्य तो न्याय दिला आहे. नवीन केंद्राची उभारणी डबेवाला कामगारांसाठी अभिमानास्पद बाब आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईचा डबेवाला संघटनेचे पदाधिकारी सुभाष तळेकर यांनी दिली आहे.
अनुभव केंद्रात ‘या’ गोष्टी असणार…
डबेवाल्यांच्या व्यवसायात काळानुरूप झालेल्या बदलाचे दर्शन घडवणारे चलचित्र, माहितीपट.
डबेवाल्यांनी वापरलेले डबे, सायकल, हातगाडी.
डबेवाल्यांच्या वेळेचे अचूक गणित पाहून ब्रिटनचे राजे प्रिन्स चार्ल्स भारावले होते. त्यांनी मुंबईत डबेवाल्यांची भेट घेतली होती. त्याच्या क्षणचित्रांचे स्वतंत्र दालन.
डबेवाल्यांच्या सेवेची दखल घेत टपाल कार्यालयासह अनेक संस्थांनी गौरव केला. त्याच्या आठवणी जागवणारी छायाचित्रे.