
बदलापूरसह उल्हासनगर, अंबरनाथ, विठ्ठलवाडी येथील आठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या गुन्हेगारांची आता खैर नाही. संवेदनशील ठिकाणी 1 हजार 593 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे दीड हजार एआय डोळ्यांची लाईव्ह नजर राहणार आहे. या कॅमेऱ्यांचे अत्याधुनिक कंट्रोल रुम उल्हासनगरात उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन आज पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते करण्यात आले.
परिमंडळ चारमध्ये उल्हासनगर, मध्यवर्ती, विठ्ठलवाडी, हिललाइन, अंबरनाथ, शिवाजीनगर, बदलापूर पूर्व आणि बदलापूर पश्चिम या आठ पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. या सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मुख्य चौक व रस्त्यांवर, संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील फुटेज परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या कार्यालयाजवळील कंट्रोलरूममध्ये थेट लाईव्ह दिसणार आहेत. उद्घाटनावेळी कल्याण परिक्षेत्राचे अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, शंकर अवताडे, अशोक कोळी, संदीप शिवले, शब्बीर सय्यद यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संशयास्पद हालचाल दिसताच व्हिडीओ स्क्रीनवर झळकणार
एआय बेस सॉफ्टवेअरमुळे गर्दी किंवा संशयास्पद हालचाल झाल्यास संबंधित कॅमेऱ्याचा व्हिडीओ तत्काळ कंट्रोलरूमच्या टीव्हीवर झळकणार आहे. ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीने स्वखर्चातून ही अद्ययावत कंट्रोलरूम उभारल ी आहे. येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील लाईव्ह हालचाली बघण्यासाठी 2 एल ईडी टीव्ही, वातानुकूल प्रणाली आहे.


























































