जव्हारच्या नव्या कोर्टात आजपासून ऑर्डर.. ऑर्डर, सुसज्ज इमारतीचे उद्घाटन

ऐतिहासिक जव्हार शहरात उभारलेल्या सुसज्ज इमारतीमध्ये उद्या सोमवारपासून ऑर्डर.. ऑर्डरचा आवाज घुमणार आहे. या इमारतीचे आज न्यायमूर्ती, वकील तसेच पोलीस अधिकारी आदींच्या उपस्थितीत उ‌द्घाटन करण्यात आले आहे. अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध झाल्याने जव्हार व परिसरातील वकील, पक्षकार यांना फायदा होणार असून प्रलंबित खटले निकालात निघतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

जव्हार हे मुकणे यांचे संस्थान होते. 1947 साली हे संस्थान हिंदुस्थानात विलीन झाल्यापासून येथील कोर्टाच्या जुन्या इमारतीमध्ये दिवाणी व फौजदारी कामकाज चालायचे. 78 वर्षांचा प्रदीर्घ कालखंड जुन्या कोर्टाने अनुभवला. गेल्या काही वर्षांपासून खटल्यांची संख्या वाढली. पक्षकार, वकील यांचीही भर पडली. त्यामुळे कामकाजावर ताण निर्माण झाला होता. जुन्या इमारतीमध्येच खटले चालत असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागायचे.

वकील संघटना व विविध सामाजिक संस्थांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर नवी इमारत उभारण्यास मंजुरी मिळाली. मात्र निधीअभावी या इमारतीचे काम बंद पडले होते. सर्व अडचणींवर मात करून आता सुसज्ज इमारत उभारली असून
त्याचे उद्घाटन आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे, अद्वैत सेठना, ठाणे जिल्हा व सत्र न्यायाल याचे न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल, जव्हारचे दिवाणी न्यायाधीश माया मथुरे, महेंद्रसिंग मुकणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ई-लायब्ररी, मेडिएशन रूमजव्हारमध्ये दोन मजल्यांची इमारत उभारली असून त्यात सिव्हिल, क्रिमिनल असे स्वतंत्र कक्ष केले आहे. त्याशिवाय इंटरनेट सेवा, ई-लायब्ररी यांची सोय केली असून पक्षकारांना तडजोड करण्यासाठी स्वतंत्र मेडिएशन रूमदेखील उभारली आहे. उद्यापासून या इमारतीमध्ये प्रत्यक्ष कामकाज सुरू होत आहे.