
भावली धरणातून गुरुत्वाकर्षणाने पाणी उचलून शहापूर तालुक्यातील जनतेची तहान भागवण्यात येणार आहे. यासाठी 200 कोटी रुपये खर्चुन ही योजना मंजूर केली असून आतापर्यंत 70 टाके कामही पूर्ण झाले आहे. मात्र आठ वर्षांपूर्वी होकार देणाऱ्या जलसंपदा विभागाने आता अचानक शहापूरल 1 भावली धरणाच्या आऊटलेटमधून वाय टॅपिंगद्वारे पुरवठा करण्यास विरोध करत स्वतंत्र विहीर बांधून पाणी उचलण्यास सांगितले आहे. यामुळे सरकारचे 200 कोटी रुपये पाण्यात जाणार असल्याने ऐनवेळी योजनेत कोलदांडा घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शहापूर तालुक्यातील माळ पठार, कसारा विभाग, शिरोळ-अजनुप विभाग, वाशाळ विभाग, तलवाडा पठार, साकडबाव पठार, डोळखांब विभाग, टाकीपठार, खर्डी व बिरवाडी या भागातील 97 गावे आणि 259 पाड्यांना दरवर्षी डिसेंबर ते मे महिन्यांत पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. धरणे खाली व गाव-पाडे उंच पठारावर असल्याने लिफ्ट पाणी योजना यशस्वी होत नाही. त्यामुळे या भागातील पाणीटंचाई कायमची दूर करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातून गुरुत्वाकर्षण पद्धतीने पाणी आणण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी 2011 मध्ये भावली योजनेला मंजुरी मिळाली. अनेक अडथळे पार करत ही योजना आता ७० टाक्के पूर्ण झाली आहे. त्यामुळे शहापूरकरांचे पाण्याचे टेन्शन संपण्याच्या मार्गावर असतानाच आता जलसंपदा विभागाने तांत्रिक खोडा घालण्याचा डाव आखल्याने संताप व्यक्त होत आहे.
शिवसेनेने अधिकाऱ्यांना ठणकावले
गुरुत्वाकर्षणाने मोफत पाणी देणे शक्य व्हावे म्हणून भावली धरणातून योजना मंजूर केली गेली. मात्र जलसंपदा विभागाने जॅकवेल बांधून पाणी उचल ण्यास केलेली सूचना अधिक खर्चिक आणि निर्थक असल्याची टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा सचिव व बिगर आदिवासी हक्क बचाव समितीचे अध्यक्ष काशिनाथ तिवरे यांनी केली आहे. त्यामुळे आढेवेढे न घेता शहापूरला वाय टॅपिंगद्वारेच पाणीपुरवठा करा असे ठणकावले आहे. कामाची गुणवत्ता तपासून ठेकेदार, संबंधित अधिकारी आणि तांत्रिक सल्लागार यांच्यावर कारवाई कारवी, अशी मागणीही काशिनाथ तिवरे यांनी केली आहे.
तर असा बसेल फटका
वाय टॅपिंगला मंजुरी न दिल्यास नवीन योजनेसाठी 27 दशलक्ष लिटर क्षमतेची विहीर बांधावी लागेल.
उन्हाळ्यात धरणाच्या पाण्याची पातळी तळ गाठते त्यावेळी ही विहीर कोरडी पडण्याची शक्यता आहे.
जॅकवेलमधून पाणी 10 कि. मी. अंतरावरील घाटनदेवीस्थित जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यासाठी ज्यादा शक्तीचे पंप लागतील.
प्रति महिना येणारे वीज बिल हे काही लाखांत असेल. शिवाय याकरिता स्वतंत्र वीज स्टेशन बनवावे लागेल,
वीजपुरवठा खंडित झाल्यास 254 किलोमीटर पाण्याची वाहिनी भरण्यास एक ते दोन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
म्हणे ऊर्जानिर्मितीस बाधा येईल
वाय टॅपिंगसाठी जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त स्थळ पाहणी केली होती. त्यावेळी जलसंपदा विभागाने कोणतीही हरकत घेतली नव्हती. मात्र आता अचानक आठ वर्षांनंतर वाय टॅपिंग करण्यास जलसंपदा विभागाने हरकत घेतली आहे. वाय टॅपिंगकरून शहापूरला पाणी दिल्यास ऊर्जा निर्मितीस बाधा येईल, अशी सबब पुढे केली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मात्र ऊर्जा निर्मितीस अडथळा येणार नाही असा दावा केला आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या भोंगळ कारभारावर टीकेची झोड उठली आहे.