
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वारंवार झालेल्या दुखापतींमुळे त्रस्त आहे. या फिटनेसच्या समस्येमुळेच त्याची क्रिकेट कारकीर्दही संकटात सापडली आहे. फिटनेससंबंधी चिंता लक्षात घेऊन इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी त्यांची निवड झाली नव्हती. आता समोर आलेल्या अहवालानुसार, इंग्लंड दौऱ्यासाठी संघ निवडण्यापूर्वी अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआय निवड समितीने शमीशी चर्चा केली आणि त्यानंतरच निर्णय घेतला होता.
मोहम्मद शमीला खराब फॉर्ममुळे संघातून वगळले गेले नाही, तर केवळ फिटनेस समस्येमुळे त्याला इंग्लंड दौऱ्यावर जाता आले नव्हते. शमी फिटनेसमुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतही खेळला नव्हता. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यापर्यंत तो फिट व्हायला हवा होता. मात्र, याच फिटनेसने दगा दिल्याने त्याला इंग्लंड दौऱ्यावरही जाता आले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या खडतर दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची उपस्थिती अत्यंत आवश्यक होती. निवड समितीने संघ जाहीर करण्यापूर्वी त्याच्याशी चर्चा केली होती; पण शमीच स्वतःच्या फिटनेसबद्दल साशंक होता. त्याच्याकडून निवड समितीला आवश्यक खात्री मिळाली नव्हती.
दुलीप ट्रॉफीत फिटनेसची परीक्षा
मोहम्मद शमी टीम इंडियाच्या निवड प्रक्रियेचा भाग आहे. मात्र, आता त्याला 28 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीत स्वतःचा फॉर्म आणि फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे. गुडघ्याची दुखापत आणि हॅमस्ट्रिंगच्या त्रासामुळे रणजी सामन्यात केवळ तीन-चार षटके टाकून बाहेर जाणारे गोलंदाज कसोटी सामन्यांच्या आव्हानांना कसे तोंड देतील, हा मोठा प्रश्न आहे.