रोहितने वर्ल्ड कपपर्यंत खेळायलाच हवे! शालेय प्रशिक्षक दिनेश लाड यांची भावना

हिंदुस्थानचा सलामीवीर रोहित शर्माने 2027 च्या आयसीसी वर्ल्ड कपमध्ये नक्कीच खेळायला हवे, अशी भावना व्यक्त केलीय त्याचे शालेय प्रशिक्षक दिनेश लाड यांनी. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2027 मध्ये होणाऱ्या या स्पर्धेत रोहितचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या वर्षाच्या सुरुवातीला रोहितच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

एकदिवसीय विश्व कपला अजून दोन वर्षांहून अधिक कालावधी असला, तसेच पुढील काही महिन्यांत 50 षटकांचे सामने कमी असल्याने, रोहितच्या वनडे कारकिर्दीबाबत अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत. प्रशिक्षक लाड यांनी 2011 च्या विजयी विश्व कप संघात रोहितचा समावेश न झाल्याची आठवण करून दिली आणि ‘देशासाठी योगदान देण्याची त्याच्यात अजूनही भूक आणि दृढनिश्चय आहे’ असे स्पष्ट केले.

‘रोहित शर्मा याने 2027 च्या विश्व कपमध्ये नक्की खेळले पाहिजे. ट्रॉफी जिंकणे हे त्याचे कायमस्वरूपी स्वप्न आहे. 2011 मध्ये तो विजयी संघाचा भाग होऊ शकला नाही. त्यामुळे हे स्वप्न साकार करण्याची त्याच्यासाठी ही मोठी संधी आहे.’ पुढील वनडे विश्व कपसाठी रोहितची निवड व्हावी, असा त्यांचा ठाम आग्रह होता.