
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील पाईटजवळील प्रसिद्ध शिव कुंडेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त महिला भाविकांना दर्शनासाठी घेऊन जाणारा टेम्पो 30 फूट खोल दरीत कोसळल्याने आठ महिलांचा मृत्यू झाला, तर 29 महिला गंभीर जखमी झाल्या. पाईट ते कुंडेश्वर मंदिर रस्त्या दरम्यान असणाऱ्या घाटात वळणावर दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.
पाईटजवळ शिव कुंडेश्वर हे प्राचीन मंदिर आहे. श्रावण महिन्यात येथे दर्शनासाठी दूरवरून भाविक येत असतात. पाईटजवळील पापळवाडी गावातील काही महिला दर्शनासाठी ऋषीकेश याच्या पिकअप टेम्पोतून कुंडेश्वर येथे निघाल्या होत्या. पाईट ते कुंडेश्वर मंदिर रस्त्या दरम्यान असणाऱ्या एका नागमोडी वळणावर टेम्पो चढावरून खाली घसरला. चालकाने ब्रेक दाबून गाडी थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र चालकाला टेम्पोवर नियंत्रण मिळवणे अशक्य झाले आणि रिव्हर्स येत टेम्पो रस्ता सोडून 30 फूट खोल दरीत कोसळला. अपघाताची माहिती मिळताच राजगुरूनगर तसेच महाळुंगे एमआयडीसी ठाण्याचे पोलीस तत्काळ घटनास्थळावर दाखल झाले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.