
देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरापाठोपाठ आता दिल्लीतही टेस्लाची एन्ट्री झाली आहे. कंपनीने आपले दुसरे शोरूम दिल्लीत उघडले आहे. दिल्लीच्या या शोरूममध्ये कंपनीने 7 चार्जरसुद्धा लावले आहेत. यामध्ये 4 सुपरचार्जर आणि 3 स्लोस्पीडचे डेस्टिनेशन चार्जर आहेत. गेल्या महिन्यात टेस्लाने मुंबईतील बीकेसीमध्ये आपले पहिले शोरूम उघडले होते, तर दुसरे शोरूम हे दिल्लीच्या एरोसिटीमध्ये वर्ल्डमार्क 3 मध्ये उघडले आहे. दिल्लीच्या शोरूममध्ये कंपनी आपले वाय इलेक्ट्रिक मॉडेलची विक्री करणार आहे. टेस्लाने एरोसिटी वर्ल्डमार्क 3 प्रोजेक्टमध्ये 8200 वर्ग फूटचे शोरूम नऊ वर्षांसाठी भाडय़ाने घेतले आहे. दिल्लीच्या या शोरूममध्ये कंपनीने 7 चार्जर दिले आहेत. सुपरचार्जरच्या मदतीने केवळ 15 मिनिटांत 267 किलोमीटरपर्यंतीच रेंज कारला मिळू शकते, तर डेस्टिनेशन चार्जरच्या मदतीने एका तासाच्या चार्जमध्ये 70 किलोमीटरची रेंज कारला मिळेल. टेस्लाचे जगभरात 70 हजारांहून अधिक सुपरचार्जर्सचे नेटवर्क आहे.