रोहित-विराटचं चुकलं!कसोटीऐवजी वन डेमधून निवृत्त व्हायला हवे होते

तडकाफडकी कसोटी क्रिकेटला अलविदा केल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे लवकरच एकदिवसीय क्रिकेटमधूनही संन्यास घेऊ शकतात, अशा बातम्यांची सध्या लाट आलीय. या दोघांचं कसोटी निवृत्तीचा निर्णयच चुकला असल्याचे मत माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने बोलून दाखवताना त्यांनी वन डेमधून निवृत्ती घेत कसोटी क्रिकेट खेळायला हवे होते अशी आपली भूमिका मांडलीय.

इंग्लंड दौऱयापूर्वी आधी रोहितने निवृत्ती जाहीर केली आणि त्यानंतर विराटनेही आपण कसोटी क्रिकेटला रामराम करत असल्याचे ट्विट करत कोटय़वधी क्रिकेटप्रेमींना धक्का दिला होता. त्यांचा हा निर्णय काहींना चुकीचा वाटत होता. पण पुणी त्यावर स्पष्ट भाष्य केलं नव्हतं. मात्र आज एका ‘यूटय़ूब’ चॅनलवर बोलताना आकाश चोप्राने सामान्यांच्या भावना आपल्या मनातून व्यक्त केल्या.

आकाश चोप्रा नेमकं काय म्हणाला…

– दोघांची मे महिन्यात इंग्लंड दौऱयापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती
– 2027 च्या विश्वचषकाच्या तयारीत दोघांच्या समावेशाबाबत अनिश्चितता.
– राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी देशांतर्गत 50 षटकांच्या क्रिकेटमधून फॉर्म आणि फिटनेस सिद्ध करण्याचे आव्हान
– मागील 12 महिन्यांत हिंदुस्थानी संघ फक्त सहा वन डे सामने खेळलाय. इतक्या कमी सामन्यांमध्ये फॉर्म आणि फिटनेस राखणे अवघड.
– तीन वन डे सामन्यांची मालिका सात-आठ दिवसांत संपते. त्यानंतर पुढील मालिका तीन महिन्यांनी आयोजित केली जाते. यादरम्यान प्रथम श्रेणी क्रिकेटची संधीही नसते.
-आयपीएलमध्ये जास्तीत जास्त 14-16 डाव खेळून, सहा महिन्यांनी फक्त काही वन डे खेळणे हे फॉर्म टिकवण्यासाठी पुरेसे नाही.